मालदीवमध्ये आता ‘इंडिया-इन’ ! मुइझ्झूने घेतला यू-टर्न ;पंतप्रधान मोदींचे कौतुक करत म्हटले,”ते एक अद्भुत व्यक्ती”

PM Modi Maldives Visit। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान भारत आणि मालदीवमध्ये ८ प्रमुख करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. ज्यामध्ये संरक्षण, व्यापार, डिजिटल सहकार्य अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. एकेकाळी इंडिया आउटचा नारा देणारे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या वर्तवणुकीत मोठा बदल झाला आहे. मालदीवच्या स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुइझ्झू यांनी सुमारे एक तास पंतप्रधान मोदींच्या शेजारी बसून संपूर्ण कार्यक्रम पाहिला.
मुइझ्झू यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांना एक अद्भुत व्यक्ती म्हटले. २०२३ मध्ये, चीनच्या जवळचे मुइझ्झू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी पंतप्रधानांबद्दल अनेक वेळा आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मालदीवला बीजिंग बेल्ट अँड रोड पायाभूत सुविधा निधी मिळाला आणि जानेवारी २०२५ मध्ये चीन-मालदीव मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली.
मालदीव-भारताचे शतकानुशतके चांगले संबंध PM Modi Maldives Visit।
मोहम्मद मुइझ्झू यांनी आता पंतप्रधान मोदींना विश्वासू मित्र म्हटले. तसेच विमानतळावर त्यांचे वैयक्तिकरित्या स्वागत करण्यासाठी प्रोटोकॉल तोडला. शनिवारी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भारत आणि मोदी यांच्याविषयी बोलताना, “पंतप्रधान मोदी हे एक अद्भुत व्यक्ती आहेत, ज्यांना भारताच्या शेजारील देशाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. मालदीव आणि भारताचे शतकानुशतके जुने चांगले संबंध आहेत. आता येणाऱ्या काळात, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, दोन्ही देशांच्या सरकारांमधील सहकार्य समृद्ध होणार आहे.”असे म्हटले.
मालदीवची अर्थव्यवस्था वाईट
सध्या, प्रचंड बजेट तूट आणि परकीय चलन साठ्यामुळे मालदीवची अर्थव्यवस्था खूप वाईट परिस्थितीतून जात आहे. आर्थिक स्थिरता आणण्यासाठी भारत सरकारने दिलेले कर्ज मुइझू सरकारसाठी महत्त्वाचे आहे. मालदीववर अजूनही चीनचे मोठे कर्ज आहे, तरीही भारत त्याच्यासाठी एक महत्त्वाचा प्रमुख भागीदार म्हणून उदयास आला आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान, भारताने मालदीवसाठी $५६५ दशलक्षची नवीन कर्ज मर्यादा जाहीर केली आहे. वार्षिक कर्ज देयक ४० टक्क्यांनी कमी करण्यासाठी एक करार देखील करण्यात आला आहे. मोहम्मद मोइझू म्हणाले की ते लवकरच भारताला भेट देतील.
मुइझ्झूकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक PM Modi Maldives Visit।
राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की मुइझ्झूचे मुख्य उद्दिष्ट मालदीवची भौगोलिक आणि आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर आणणे आहे. व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन क्षेत्रात ते भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. मुइझ्झू म्हणाले, “भारत हा पर्यटन क्षेत्रात मालदीवला मदत करणाऱ्या प्रमुख पर्यटन देशांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर त्यात खूप वाढ होणार आहे. मला विश्वास आहे की या भेटीमुळे दोन्ही देशांमधील लोकांमधील परस्पर देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात वाढेल.”





