दर्शनरांग प्रकल्पाचे लोकार्पण –
\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, महसुल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. साई संस्थानने बांधलेल्या दर्शनरांग प्रकल्पाचे पंतप्रधानांनी काकडी येथील कार्यक्रमातुन दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. मोदी यांची ही तिसरी शिर्डी भेट होती. जवळपास वीस मिनिटे ते मंदिर व परिसरात होते.
\nनिळवंडे धरणाचे मोदी यांच्या हस्ते जलपूजन –
\nअकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे जलपूजन व लोकार्पण गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण साईट येथे कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेचे कळ दाबून पाणी सोडण्यात आले.
\nपाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी केंद्राने मदत करावी – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मोदींना साकडे
\nपश्चिम नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी मोठा खर्च लागणार असून, ही योजना पूर्णत्वास नेणे राज्याच्या आर्थिक आवाक्याबाहेर आहे. मात्र, या योजनेला केंद्र सरकारने मदत केल्यास लाखो, करोडो शेतकऱ्यांना फायदा होऊन राज्य दुष्काळमुक्त होईल, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले.
\nमोदींच्या हाताला यशाचा परीस स्पर्श – मुख्यमंत्री शिंदे
\nगेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय तुमच्यासमोर आहेत. समृद्धी, मेट्रो, 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. ते कार्य पुढे नेत आहोत. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे काम सरकार करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाला हात लावतात, भूमिपूजन करतात तो प्रकल्प वायूवेगाने पुढे जातो आणि पूर्ण होतो असा अनुभव आहे. त्यांच्या हाताला यशाचा परीस स्पर्श आहे. हात लावताच त्याचे सोने होते असा अनुभव आहे. म्हणून आम्ही त्यांना वारंवार बोलावतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कृषिमंत्री असताना “त्यांनी’ शेतकऱ्यांसाठी काय केले? – पंतप्रधान मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर केला हल्लाबोल –
\nमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले गेले. राज्यातील एक वरिष्ठ नेते केंद्रात कृषिमंत्री राहिले. व्यक्तिगत मी त्यांचा सन्मान करतो; पण त्यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? अशा शब्दांत शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) शिर्डीत त्यांच्यावर हल्लाबोल केला.
\nपंतप्रधान मोदी म्हणाले की, ते कृषिमंत्री असताना 7 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ देशातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांचे हमीभावावर अन्नधान्य खरेदी केले. परंतु इतक्याच कालावधीत आमच्या सरकारने हमीभावाने साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. सन 2014च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची 500 ते 600 कोटी रुपयांची हमीभाव केंद्रावर खरेदी व्हायची. आमच्या सरकारने 1 लाख 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ते कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पैशांसाठी दलालांच्या भरवशावर राहायला लागायचे. महिनो-महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते.
\nआमच्या सरकारने हमीभावचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायची योजना आणली. रब्बी पिकांसाठी हमीभावाची घोषणा केल्याने त्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मागील 9 वर्षांत 70 हजार कोटींचे इथेनॉल खरेदी केले. ऊसउत्पादकांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी कारखान्यांना मदत केली, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना आणली त्याचा आनंद आहे. इथल्या शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळतील, असे मोदी म्हणाले.
\nशेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तडफडत ठेवले. सन 1970मध्ये निळवंडे प्रकल्पाला मान्यता मिळाली. हा प्रकल्प पूर्ण होण्यास 5 दशके लागली. आमचे सरकार आल्यावर योजनेला गती मिळाली आणि आता लोकांना कालव्यातून पाणी मिळत आहे. बळिराजा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पाणी परमात्म्याचा प्रसाद आहे. एक थेंबही पाणी वाया घालवू नका, ही शेतकऱ्यांना विनंती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची बचत करा, असे आवाहन मोदी यांनी केले.
\nविकसित देशाचा संकल्प करू या!
\nमहाराष्ट्रात अपार सामर्थ्य आहे. जितका जलद महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच भारताचा विकास होईल. महाराष्ट्रात रेल्वे विस्ताराचा सिलसिला सातत्याने सुरू आहे. सन 2047मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, तेव्हा जगात भारताचे नाव विकसित देशांमध्ये होईल हा संकल्प करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.