एकेकाळी ‘बॉयकॉट इंडिया’ म्हणणाऱ्या मोईज्जू यांनी मालदीवमध्ये पंतप्रधानांचे केले भव्य स्वागत

PM Modi in Maldives। पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. मालदीवमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. अध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी मोदींची गळाभेट घेतली. या भव्य स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, संपूर्ण जगाने भारताची ताकद पाहिली आहे. विशेष म्हणजे काही काळापूर्वीपर्यंत भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण होते, परंतु आता मोईज्जू सरकारने संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदी मालदीवला का गेले?
या भव्य स्वागताच्या व्हिडिओमध्ये, केवळ मोईज्जूच नाही तर संपूर्ण मालदीव सरकार विमानतळावर पोहोचले असल्याचे दिसत आहे. सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदी मोईज्जू यांच्या निमंत्रणावरून मालदीवला पोहोचले आहेत, ते याठिकाणी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या 60 व्या वर्धापन दिनात सहभागी होणार आहेत, ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
मालदीवचा बदलता दृष्टिकोन PM Modi in Maldives।
आता पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्याचे कारण म्हणजे मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध बऱ्याच काळापासून बिघडलेले होते.ते सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही भेट असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान , मोईज्जू सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी प्रथम, मालदीवमध्ये भारतीय सैन्याची उपस्थिती हा वादाचा विषय बनवत त्यांना तिथून माघारी धाडले होते. त्याशिवाय, मालदीवची चीनशी वाढती मैत्री देखील भारताला अस्वस्थ करत होती. गेल्या वर्षी लक्षद्वीप वादामुळेही संबंधांमध्ये कटुता आली होती.
मालदीव-लक्षद्वीप वाद काय आहे?
मालदीव-लक्षद्वीप वाद म्हणजे गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला भेट दिली तेव्हा मालदीवने असा टोमणा मारला होता की त्यांच्या देशाच्या तुलनेत भारतात काहीही नाही. तेव्हापासून, आरोप-प्रत्यारोपांचा काळ सुरू झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले. मात्र यामुळे मालदीवलाही मोठे नुकसान सहन करावे लागले कारण लोकांनी त्या देशातील तिकिटेही रद्द केली. त्याचा फटका मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बसला.





