पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक कुवेत भेटीतून भारताला काय मिळाले? ; ‘या’ दोन क्षेत्रांसाठी महत्वाची चर्चा

PM Modi in Kuwait । कुवेतचा दोन दिवसांचा ऐतिहासिक दौरा यशस्वीरित्या संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री मायदेशी परतले. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतला गेले होते. यादरम्यान त्यांनी अनेक द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि भारत-कुवेत संबंध अधिक दृढ करण्याचे संकेतही यावेळी दिले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये दोन्ही देशातील यशस्वी चर्चांविषयी माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी, “कुवेतचा ऐतिहासिक आणि यशस्वी दौरा संपन्न झाला! पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीला गेले.” असे त्यांनी म्हटले आहे.
या विषयांवर झाली चर्चा PM Modi in Kuwait ।
या ऐतिहासिक भेटीदरम्यान मोदींनी कुवेतच्या अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह आणि क्राउन प्रिन्स सबाह अल-खलिद अल-हमद अल मुबारक अल-सबाह यांच्यासह कुवेतच्या सर्वोच्च नेतृत्वाशी विस्तृत चर्चा केली. ज्यामध्ये त्यांनी आयटी, फार्मास्युटिकल्स, फिनटेक, ऊर्जा, गुंतवणूक, व्यापार, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या क्षेत्रातील संबंधांना चालना देण्यावर चर्चा केली. मोदींची कुवेत भेट ही 43 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांनी आखाती देशाला दिलेली पहिली भेट होती.
شكرًا للكويت! كانت هذه الزيارة تاريخية وستعزز بشكل كبير علاقاتنا الثنائية. أشكر حكومة وشعب الكويت على حفاوة الاستقبال. كما أشكر رئيس وزراء الكويت على اللفتة الخاصة المتمثلة في القدوم إلى المطار لتوديعنا. pic.twitter.com/0XOKh5M2pE
— Narendra Modi (@narendramodi) December 22, 2024
‘हा प्रवास ऐतिहासिक होता’
या भेटीच्या यशस्वी पूर्ततेबद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर कुवेतच्या अमीरांचे आभार मानले. त्याविषयी लिहिताना मोदींनी, “धन्यवाद कुवेत! ही भेट ऐतिहासिक होती आणि त्यामुळे आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. मी कुवेतच्या सरकारचे आणि जनतेचे अभिनंदन करतो. कुवेतच्या पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी विमानतळावर येण्याच्या विशेष हावभावाबद्दल धन्यवाद.”असे त्यांनी म्हटले आहे.
तर दुसऱ्या आणखी एका पोस्टमध्ये मोदींनी, “आमच्या देशांमधील घनिष्ठ संबंधांच्या अनुषंगाने, आम्ही आमची भागीदारी धोरणात्मक पातळीवर उंचावली आहे आणि मला आशा आहे की आमची मैत्री आगामी काळात आणखी घट्ट होईल.”असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांना सर्वोच्च सन्मान PM Modi in Kuwait ।
याशिवाय उभय देशांमधील संबंधांना बळकट करण्यासाठी आणि नवी ऊर्जा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांना कुवेतमध्ये ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच वेळी, शनिवारी, पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि भारतीय कामगार शिबिराला भेट दिली. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात US$10.47 अब्ज एवढा द्विपक्षीय व्यापार असलेला आखाती देश भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. त्यामुळे कुवेत हा भारताला कच्च्या तेलाचा सहावा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे, जो देशाच्या 3% ऊर्जा गरजा पूर्ण करतो.
कुवेतमध्ये भारतीय निर्यात वाढतीय
कुवेतला भारतीय निर्यात प्रथमच US$2 बिलियनवर पोहोचली आहे, तर कुवेत गुंतवणूक प्राधिकरणाने भारतात US$10 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.





