Women In Modi Cabinet: सर्वात तरुण रक्षा खडसेंसह 7 महिला मंत्र्यांना काय जबाबदाऱ्या मिळाल्या, पाहा यादी

Modi Cabinet Women Ministers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळांमध्ये विभागांची विभागणी केली आहे. मागील सरकारमधील भाजपच्या पाच महत्त्वाच्या मंत्र्यांची खाती नव्या सरकारमध्येही तशीच ठेवण्यात आली आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या नावांचा समावेश आहे. रक्षा खडसे या मंत्रिमंडळात सामील झालेल्या सर्वात तरुण महिला मंत्री आहेत. त्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, रविवारी, 9 जून रोजी मोदी सरकार 3.0 ने शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भव्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण 72 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एकूण 30 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. 72 मंत्र्यांमध्ये सात महिलांचाही समावेश आहे. आता विभागांची विभागणी झाली आहे, जाणून घेऊया महिलांकंडे कोणती जबाबदारी आहे?
निर्मला सीतारामन: त्यांना अर्थमंत्र्यांसह कॉर्पोरेट व्यवहार मंत्री बनवण्यात आले आहे. याआधीही निर्मला सीतारामन मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सीतारामन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांचा पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
अन्नपूर्णा देवी : त्यांना महिला आणि बालविकास मंत्री करण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अन्नपूर्णा देवी यांना पुन्हा एकदा मंत्री करण्यात आले आहे. झारखंडच्या कोडरमा मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेत पोहोचलेल्या अन्नपूर्णा यांची आज भाजपच्या सशक्त महिला नेत्यांमध्ये गणना केली जाते.
शोभा करंदलाजे : कर्नाटकमधून निवडून आलेल्या भाजपच्या महिला खासदार शोभा करंदलाजे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. शोभा या माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या जवळच्या मानल्या जातात. त्यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात शोभा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच अन्न आणि प्रक्रिया मंत्रालयाची जबाबदारी होती.
रक्षा खडसे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या रक्षा खडसे या दुसऱ्या सर्वात तरुण मंत्री आहेत. त्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे. 37 वर्षीय रक्षा यांनी बीएस्सीपर्यंत कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या आधी. राम मोहन नायडू (36 वर्षे) हे सर्वात तरुण मंत्री आहेत. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. त्यांचा निखिल खडसे यांच्याशी विवाह झाला होता. मात्र निखिल यांचा मृत्यू झाला. निखिल यांनी 2013 मध्ये स्वत:वर गोळी झाडली होती असे सांगण्यात येते.
अनुप्रिया पटेल: उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर मतदारसंघातून नवनिर्वाचित लोकसभा खासदार, अनुप्रिया पटेल या मोदी सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. कल अपना दल (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. अनुप्रिया यापूर्वीही राज्यमंत्री होत्या.
सावित्री ठाकूर: मध्य प्रदेशातील धार येथील खासदार सावित्री ठाकूर यांना महिला आणि बालविकास मंत्रालयात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांचा जन्म 1 जून 1978 रोजी झाला. त्या RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) पार्श्वभूमीतून आल्या आहे. मध्य प्रदेशातील धार लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या खासदार सावित्री ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मोदी 3.0 मध्ये त्यांना मंत्री करण्यात आले आहे. निवडणुकीत सावित्री यांनी काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मुवेल यांचा दारूण पराभव केला होता.
निमुबेन बंभनिया: गुजरातमधून लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या निमुबेन बंभनिया यांना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे. 57 वर्षीय भाजप खासदार निमुबेन बांभनिया यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांनी आम आदमी पार्टी (आप) च्या उमेश मकवाना यांचा 4.55 लाख मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. त्यांनी 2009-10 आणि 2015-18 दरम्यान भावनगरच्या महापौर म्हणूनही काम केले. बंभनिया, माजी शिक्षक, 2004 मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या आणि 2013 ते 2021 दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या गुजरात युनिटच्या उपाध्यक्षा होत्या. बांभनिया या ओबीसी कोळी समाजातील आहेत. त्यांचे पती भावनगरमध्ये शाळा चालवतात.





