नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय; डीएपी खताच्या किंमती वाढणार नाही, पीक विमा…

New Year Gift for Farmers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत म्हणाले की, नवीन वर्षाचा पहिला निर्णय आपल्या देशातील करोडो शेतकरी बंधू भगिनींना समर्पित आहे. पीक विम्याचे वाटप वाढवण्यास आम्ही मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना अधिक संरक्षण मिळेल, तसेच नुकसानीची चिंताही कमी होईल.
नए वर्ष का पहला निर्णय हमारे देश के करोड़ों किसान भाई-बहनों को समर्पित है। हमने फसल बीमा के लिए आवंटन बढ़ाने को मंजूरी दी है। इससे जहां अन्नदाताओं की फसलों को और ज्यादा सुरक्षा मिलेगी, वहीं नुकसान की चिंता भी कम होगी। https://t.co/s4QOIGHTsj
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2025
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, मंत्रिमंडळाने डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतासाठी 3,850 कोटी रुपयांपर्यंतचे एकरकमी विशेष पॅकेज मंजूर केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना डीएपी खताच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा येणार नाही आणि त्याच्या किमतीतही दिलासा मिळणार आहे. या विशेष पॅकेज अंतर्गत केंद्र सरकार खत कंपन्यांना आर्थिक मदत करेल, जेणेकरून ते शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरू ठेवू शकतील आणि किमती नियंत्रित ठेवता येतील.
डीएपी खताच्या पिशवीची किंमत?
शेतकऱ्यांना 50 किलोची डीएपी खताची पिशवी केवळ 1350 रुपयांना मिळणार आहे, त्याचा अतिरिक्त भार सरकार उचलणार आहे. तसे, या एका बॅगची किंमत सुमारे 3000 रुपये आहे. यासाठी एकरकमी 3850 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीच्या किमतीत चढ-उतार होत असले तरी त्याचा भारतातील शेतकऱ्यांवर परिणाम होणार नसल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी अनेक पावले उचलली –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पंतप्रधान पीक योजनेचे वाटप 69515 कोटी रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्गठित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 2021-22 ते 2025-26 पर्यंत एकूण 69,515.71 कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांसाठी न टाळता येण्याजोग्या नैसर्गिक आपत्तींपासून पिकांच्या जोखमीचे संरक्षण करण्यात मदत होईल.
DAP चा अर्थ काय?
डीएपी म्हणजे डी-अमोनियम फॉस्फेट, हे एक खत आहे, जे पिके आणि वनस्पतींसाठी फॉस्फरस आणि नायट्रोजनचा मुख्य स्त्रोत आहे. डीएपी हे पाण्यात विरघळणारे खत आहे जे अमोनिया आणि फॉस्फोरिक ऍसिडच्या अभिक्रियाने बनते. शेती आणि इतर उद्योगांसाठी हा एक लोकप्रिय पर्याय आहे कारण तो जलद विरघळतो आणि त्यात उच्च पोषक घटक असतात.


