पंतप्रधान मोदींनी तोडला इंदिरा गांधींचा विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे दुसरे नेते

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सलग 4,078 दिवस पंतप्रधानपदाचा विक्रम मोडत सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे दुसरे नेते बनण्याचा मान मिळवला आहे.
25 जुलै 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कार्यकाळाचे 4,078 दिवस पूर्ण केले. यासह त्यांनी इंदिरा गांधी यांच्या जानेवारी 1966 ते मार्च 1977 या कालावधीतील सलग 4,077 दिवसांच्या पंतप्रधानपदाचा विक्रम मागे टाकला. हा टप्पा पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीतील ऐतिहासिक अध्याय अधोरेखित करतो.
2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरुवात करत, गेल्या सुमारे 24 वर्षांपासून मोदी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निवडणूक जिंकून सरकारचे नेतृत्व करत आहेत. ही कामगिरी इतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाच्या तुलनेत दीर्घकाळ आहे.1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेले आणि सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे ते एकमेव नेते आहेत. हिंदी नसलेल्या राज्यातून आलेले असूनही सर्वाधिक काळ या पदावर राहणारे ते पहिले नेते ठरले आहेत.
ते भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे गैर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत आणि किमान दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवणारे ते एकमेव गैर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर बहुमताने पुन्हा निवडणूक जिंकणारे ते पहिले पंतप्रधान आहेत.त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आपल्या पक्षाला सलग तीन राष्ट्रीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला, ही कामगिरी यापूर्वी फक्त जवाहरलाल नेहरू यांनीच साध्य केली होती.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा कालावधी धरून, मोदींनी पक्षाच्या चेहरे म्हणून सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत – तीन गुजरातमध्ये आणि तीन राष्ट्रीय स्तरावर.





