मुंबई – मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात अनेकांना रोजगाराची नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मजूर करण्यात आल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील तरुणांना अधिक रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा विश्वास देखील यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी म्हणून स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. तसेच दलित, आदिवासी यांच्यसह महिलांना देखील रोजगाराच्या समान संधी उपलब्ध होत आहे अशी माहिती देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. गेल्या आठ वर्षात ८ कोटींहून अधिक महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत तसेच या महिला इतर महिलांना देखील रोजगार देत आहेत असंही मोदी यावेळी म्हणाले. काय म्हणाले नेमकं मोदी यावेळी आज देशभरात सरकार मोठी गुंतवणूक करत आहे. ज्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात २ लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.