पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांचा ‘MH 01’ च्या टोयोटा फॉर्च्युनरमधून प्रवास, …म्हणून वापरली मुंबई पासिंगची गाडी?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज (गुरुवारी) दिल्लीत दाखल झाले. दिल्लीतील पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून मिठी मारली आणि एकाच गाडीतून पुढील प्रवासाला सुरुवात केली. मात्र, यावेळी वापरण्यात आलेल्या गाडीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
जगभरात आपल्या प्रवासासाठी रशियन बनावटीची Aurus Senat Limosuine वापरणारे पुतिन, आज दिल्ली विमानतळावरून भारतीय नोंदणीकृत पांढऱ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीतून पंतप्रधानांसोबत निघाले. विशेष म्हणजे, या गाडीचा नोंदणी क्रमांक MH 01 असून, तो मुंबई पासिंगचा आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, ही गाडी पंतप्रधानांच्या ताफ्यातील अधिकृत गाडी नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सुरक्षेबद्दल विशेष काळजी घेणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी अचानक मुंबई पासिंगची गाडी वापरल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi and Russian President Vladimir Putin travel in the same car, as they depart from the Palam Technical Airport in Delhi
President Putin is on a two-day State visit to India. He will hold the 23rd India-Russia Annual Summit with PM Narendra… pic.twitter.com/7Qz2cHOtnx
— ANI (@ANI) December 4, 2025
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी याच MH 01 टोयोटा फॉर्च्युनरमधून पंतप्रधानांच्या निवासस्थानी खासगी डिनरसाठी प्रवास केला. पंतप्रधान मोदींनी आपल्या वैयक्तिक एक्स हँडलवर गाडीतील दोघांचा सेल्फीही पोस्ट केला आहे.
पुतिन यांचा अधिकृत दौरा उद्या, ५ डिसेंबर रोजी सुरू होणार असून, यात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट, राजघाट येथे श्रद्धांजली आणि हैदराबाद हाऊस येथे रशिया-भारत शिखर परिषदेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच विविध करार देखील होण्याची शक्यता आहे.





