प्रतिक्षा संपणार! ‘या’ तारखेला बँक खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेंतर्गत 18 हप्ते देण्यात आले आहेत. लवकरच योजनेचा 19वा हप्ता दिला जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 19वा हप्ता कधी दिला जाणार याची तारीख सांगितली आहे.
या योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून जारी करण्यात आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते. या योजनेचा पुढील हप्ता कधी दिला जाणार याबाबत शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती. याबाबत आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली असून, या योजनेचा पुढील हप्ता 24 फेब्रुवारी 2025 ला जारी केला जाणार आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली की, 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये बिहारमधून या योजनेचा पुढील हप्ता जारी केला जाईल.
#WATCH पटना: केन्द्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने कहा, “मैं बिहार के कृषि मंत्री और मुख्यमंत्री को बहुत बधाई देता हूं। यहां कृषि और किसानों के लिए बहुत अच्छा काम हो रहा है। प्रधानमंत्री 24 फरवरी को प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के वितरण के लिए बिहार पधारेंगे…”
दिल्ली… pic.twitter.com/i3tzvvjzrZ
— ANI_HindiNews (@AHindinews) January 24, 2025
केवळ याच शेतकऱ्यांना मिळणार फायदा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ ठराविक शेतकऱ्यांनाच मिळतो. जे सरकारी नोकरीत आहेत, अथवा कर भरतात ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच, कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तुम्ही देखील अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या योजनेशी संबंधित कोणतीही समस्या अथवा माहिती हवी असल्यास [email protected] या ईमेल आयडी आणि 155261/ 1800115526/011-23381092 या क्रमांकावर संपर्क करू शकता.




