PM Dhan Dhanya Krishi Yojana: काय आहे प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना, कोणाला आणि कसा मिळेल लाभ?

PM Dhan Dhanya Krishi Yojana: केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ला मंजुरी दिली आहे. ही योजना पुढील सहा वर्षांसाठी राबवली जाणार असून, देशातील १०० जिल्ह्यांचा यात समावेश असेल. या योजनेसाठी दरवर्षी २४,००० कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पिक कापणीनंतर चांगल्या साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे, सिंचन व्यवस्था सुधारणे आणि शेती उत्पादन वाढवणे हा आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साध्य होईल.
३६ योजनांचा समन्वयाने मजबूत ढाचा –
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ही योजना विद्यमान ३६ योजनांचा समन्वय साधून एक मजबूत ढाचा तयार करेल. यामुळे पीक वैविध्याला चालना मिळेल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेच्या माध्यमातून छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक आणि फायदेशीर शेतीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
योजनेचा लाभ कसा मिळेल?
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेद्वारे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल. शाश्वत शेती पद्धतींवर भर दिला जाईल, ज्यामुळे पर्यावरणीय समतोल राखला जाईल. पिक कापणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी पंचायत आणि ब्लॉक स्तरावर साठवणूक सुविधा बळकट केल्या जातील. याशिवाय, सिंचन सुविधा सुधारल्या जातील आणि शेतकऱ्यांना सहज उपलब्ध आणि स्वस्त कर्ज सुविधा दिली जाईल, ज्यामुळे ते शेतीत गुंतवणूक करू शकतील आणि उत्पादन क्षमता वाढवू शकतील.
१.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ –
सरकारच्या अंदाजानुसार, या योजनेमुळे सुमारे १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल. ही योजना यापूर्वीच अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती आणि आता मंत्रिमंडळाने याला हिरवा कंदील दाखवला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडण्याची शक्यता आहे.

