पुणे जिल्हा | अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ

दावडी, (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात देशमुखवाडी येथील अंगणवाडीतील मुलांना शालेय पोषण आहार सामग्री मुदत संपलेला पोषण आहार वाटप केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 5) रोजी उघडकीस आली.
खेड पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत तालुक्यात जवळपास पाचशेच्या वर अंगणवाड्या असून अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांना पोषण आहार दोन महिन्यांनी दिला जातो.
देशमुखवाडी येथील अंगणवाडीतून कातकरी समाजातील मुलाच्या पालकांना देण्यात आलेल्या पोषण आहार सामग्रीची मुदत (एक्सपायरी) संपलेली असल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाचा कारभार किती भोंगळ सुरू आहे, यामुळे स्पष्ट होत आहे. या चिमुकल्या मुलांच्या पालकांना चनाडाळ, मुगडाळ, हळद पावडर व अन्य वस्तू या मुदत संपलेल्या दिल्या आहेत.
खेड पंचायत समितीत एका मुलाचे वडील यांनी देण्यात आलेला पोषण आहाराच्या पॅकिंगमधील वस्तू घेऊन आले होते. त्यांच्या समवेत देशमुखवाडी गावचे माजी सरपंच संदीप देशमुख होते; मात्र अनेक मुदत संपलेल्या पोषण आहार मिळत असून सुध्दा का आवाज उठवत नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आहार द्यायचा तर चांगला द्या नाहीतर आमच्या बालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असे कुणीही करू नये असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला.
गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या मुलाला पोषण आहार दिला जात नव्हता. याबाबत मी संबंधित अंगणवाडी शिक्षिकेला विचारणा केली तेव्हा त्यांनी तुमचे आधार कार्ड नाही म्हणून तुम्हाला शासनाकडून तुमचा पोषण आहार येत नाही. आता मी आधार कार्ड अंगणवाडी दिलं तर त्यांनी मला मुदत संपलेली सामग्री दिली. -देविदास भालेराव, पालक
कालबाह्य झालेला पोषण आहार दिला गेला असेल तर संबंधित पोषण आहार देणार्यांवर कारवाई करण्यात येईल.- विशाल शिंदे, गट विकास अधिकारी खेड
गहू – पॅकिंग दिनांक – ऑगस्ट 2023
पॅकिंग केल्यापासून तीन महिने चांगला राहतो
हळद – पॅकिंग दिनांक – ऑगस्ट 2023
पॅकिंग केल्यापासून आठ महिने चांगला राहतो
चणा – पॅकिंग दिनांक नोव्हेंबर 2023
पॅकिंग केल्यापासून चार महिने चांगला राहतो




