पिंपरी | प्लॅस्टिक कागद, ताडपत्री महागली

तळेगाव स्टेशन, {संदीप गाडेकर} – शनिवारपासून मावळ तालुका आणि कर्जत परिसरात अवकाळी पाऊस पडत आहे. पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचावासाठी प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रींची आवश्यकता भासत आहे. यामुळे प्लॅस्टिक कागद व ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांसह शेतकरी, उद्योजक यांच्याकडून दुकानांवर गर्दी होत आहे.
यामुळे प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्री यांच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवक कमी व मागणी अधिक असल्याने दरातही ३५ टक्के वाढ झालेली आहे.
दर वर्षी साधारणतः ७ जूनच्या आसपास पावसाला सुरूवात होते. मावळ तालुक्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारपासून तालुक्यातील अनेक भागांना या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचेही नुकसान झाले आहे.
वळीवाच्या पावसापासून शेती पिकांचा बचाव व्हावा पॉलिहाऊस तसेच घरांना गळती लागून नुकसान होऊ नये. तसेच शहरी भागातील छोटे-मोठे व्यापाऱ्यांनी मागून ठेवलेला विविध प्रकारचा साहित्याचा साठा औद्योगिक क्षेत्रात कंपनी परिसरात तयार करून ठेवलेले उत्पादन पावसात भिजू नये.
याची खबरदारी घेत पाऊस पडताच शेतकरी, सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्री घेण्यासाठी दुकानांवर गदीं केली असून ग्रामीण भागातून त्यास अधिक मागणी आहे. शेतकऱ्यांचा त्यात अधिक समावेश आहे. आत्तापासूनच खरेदी विक्री सुरू झाल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त करण्यात आले.
प्लॅस्टिक विक्रीची सर्वच दुकाने ग्राहकांनी गजबजली आहे. खासकरुन रोल प्लॅस्टिकची सर्वाधिक विक्री होत आहे. त्यापाठोपाठ ताडपत्रीची विक्री होत आहे. वाहनधारकांकडूनही प्लॅस्टिक तसेच ताडपत्रीच्या वाहन कव्हरची मागणी होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे वाढलेली मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. यातच कच्च्या मालाचे दर वाढले आहे. त्यामुळे ताडपत्री आणि प्लॅस्टिक कागदाच्या दरात वाढ झाली आहे.
असे आहेत दर
ताडपत्री प्रकार दर (रुपयांमध्ये)
पावसाळी प्लॅस्टिक ९० ते १४०
पातळ वर्जीन प्लॅस्टिक ३० ते १०० मीटर
जाड वरर्जीन प्लॅस्टिक १५० ते १८० मीटर
सहा प्रकारची पावसाळी ताडपत्री १३० ते ६ हजार
नायलॉन ताडपत्री ७२० ते दीड हजार
प्लॅस्टिक रोल ८० ते १६० मीटर
नायलॉन दोरी १८० किलो
रेशीम, सूत दोरी बंडल ८० ते १८०
रिक्षा कव्हर ५५० पासून पुढे
दुचाकी कव्हर १५० ते ८५०
चारचाकी कव्हर ६५० ते १ हजार ८००



