महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांवर बंदी येणार; १०५ आमदारांचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई – राज्यात सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक फुलांचा वापर होत असून यामुळे नैसर्गिक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकार प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याच्या विचारात असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, या मागणीला सत्ताधारी व विरोधी पक्षातील एकूण १०५ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. प्लास्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाहीत, उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो, अशी भूमिका यामागे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. मंत्री गोगावले यांनीही कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे स्पष्ट केले आहे.





