इंदापूरात संत तुकोबारायांच्या पालखी तळावर सुवर्ण पिंपळ, अजान वृक्षांचे रोपण

इंदापूर : माऊली हरित अभियान आणि बायोस्पिअर संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळावर अजान वृक्ष, सुवर्ण पिंपळ आणि नांदृक वृक्षांचे रोपण करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यंदा प्रथमच पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या भेटीला येत असल्याच्या सुवर्ण योगावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिरातून रोपांची पालखी काढून झाली. यामध्ये मोठ्या संख्येने इंदापूरकरांनी उत्साहाने सहभाग घेतला. माऊली हरित अभियानाचे प्रमुख डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून वृक्ष संगोपनामुळे पालखी तळावरील वृक्षांची संख्या वाढली असून, काही वृक्ष दहा फूट उंचीपर्यंत वाढले आहेत. यामुळे पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळाली आहे.
याप्रसंगी वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायरा अत्तार आणि जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजच्या प्रमुख लता नायकुडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दत्तात्रय गायकवाड आणि शैलेंद्र पटेल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा अलका ताटे, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे, ॲड. आनंद केकान, ह.भ.प. ओंकार महाराज जौंजाळ, ह.भ.प. शेषांगर महाराज बोबडे, ह.भ.प. मीनिनाथ महाराज कुंभार, ह.भ.प. दिनेश महाराज गायकवाड, प्रा. जयश्री सरवदे, स्वाती अधटराव, लता नागपुरे, रोहिणी जौंजाळ, वर्षा गाढवे, मीना वेदपाठक, श्यामल घासकाटू, हमीदभाई अत्तार, प्रशांत सिताप, चंद्रकांत देवकर, संतोष जामदार, भारत बोराटे, अशोक ननवरे, सफल घासकाटू, रामेश्वर साठे, प्रशांत गिड्डे, रविंद्र परबत, शरद झोळ, डॉ. सुदिप ओहोळ, किसन पवार, देवराम मते, असलम शेख, ज्ञानदेव शिंदे, सुहास जौंजाळ आदी उपस्थित होते.
आळंदी-पंढरपूर दर्शनाची अनुभूती इंदापूरात –
प्रा. कृष्णाजी ताटे यांनी सांगितले की, इंदापूरातील वृक्ष लागवडीमुळे शहर पर्यावरणपूरक बनत आहे. सुवर्ण पिंपळ, अजान वृक्ष आणि नांदृक वृक्षांमुळे आळंदीतील ज्ञानेश्वर माऊली आणि देहूतील संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद इंदापूरात अवतरला आहे. भविष्यात या वृक्षांना प्रदक्षिणा घालताना इंदापूरकरांना देहू, आळंदी आणि पंढरपूर येथील दर्शनाचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





