पुणे | आपटाळे बीट अंतर्गत 218 कलमी रोपांची लागवड

पुणे, (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यातील आपटाळे बीट अंतर्गत इंगळूण, उच्छिल व तांबे चार केंद्रांतील जिल्हा परिषद अंतर्गत 34 शाळांच्या शालेय परिसरात आंबा, फणस, पेरू, चिकू, जांभूळ, सफरचंद, रामफळ, सीताफळ, आवळा, केळी, नारळ आदी 218 कलमी रोपांची लागवड करण्यात आली आहे.
अशी माहिती जुन्नरच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग यांनी दिली. यापैकी आपटाळे, सुराळे, घोगरेवाडी, इंगळूण, सुकाळवेढे, दुर्गावाडी परिसरात अभंग यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांसमवेत वृक्षारोपण केले.
याशिवाय आपटाळे बीट अंतर्गत शंभर टक्के शाळांमध्ये सीडबॉल निर्मिती व रोपण उपक्रम राबविण्यात आला. उच्छिल केंद्र 3265, आपटाळे 4246, तांबे 1300, इंगळून 1480 असे एकूण 10 हजार 291 बियांचे सीडबॉल तयार करून शालेय परिसर, गावातील माळरान,
शेतातील बांधावर व शिक्षकांनी रोपण केले. शालेय परसबाग उपक्रमांतर्गत मिरची, वांगे, कोबी, बटाटे, कांदे, बी वर्गीय, वेलवर्गीय आदी रोपांची लागवड करण्यात आली.
औषधी वनस्पतींमध्ये पुदिना, कोरफड, गवती चहा, तुळस यासह शेवगा, लिंबू, कढीपत्ता यांची लागवड केली आहे. पर्यावरणाचा होत असलेला र्हास लक्षात घेऊन शालेय परिसरातील कलमी फळझाडांची लागवड उपक्रम पर्यावरण पूरक असून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारा आहे.
उपक्रम यशस्वीतेसाठी आपटाळे बीट मधील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे.





