satara | विसर्जन न करता केले वृक्षारोपण

सातारा, (प्रतिनिधी) – फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे ( ८१) यांचे दुर्धर आजाराने सांगली येथे निधन झाले. त्यांच्या कुटुंब तसेच मित्रपरिवाराने त्यांच्या अस्थी जमिनीत पुरून त्यावर वृक्षारोपण केले आणि एक वेगळा पायंडा समाजासमोर मांडला.
डॉ. रविंद्र हर्षे हे जुन्या काळातील नामवंत डॉक्टर मार्क्सवाद चे गाडे अभ्यासक होते. त्यांनी कधीच कर्मकांड मानली नाहीत. त्याच विचारांना पुढे नेण्याचे काम त्यांची दोन्ही मुले अनिकेत आणि डॉ. गिताने केले. त्यांच्या अस्थी संगम माहुली येथे पुन्हा निसर्गात विलीन करून वृक्षारोपण केले. नद्यांमध्ये अस्थी सोडून आपण तेच जल पितो आणि अस्थी नदीत सोडून ती नदी पण प्रदूषित करतो.
त्यापेक्षा अस्थी ह्या मातीत मिसळून त्याचे खत तयार होते आणि त्यावर लावलेले वृक्ष हे अनेकांना ऑक्सिजन तसेच सावली देण्याचे काम करते. त्यामुळे डॉ. हर्षे यांनी कायम गोरगरिबांसाठी काम केले त्याच्या जाण्यानंतर पण वृक्षरुपी सावली चिरंतर राहो म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितलं.
जुन्या काळातले सातारचे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ म्हणून ते ओळखले जात. अत्यंत शांत मनमिळावू आणि कायम गरीब रुग्णांना मदत करणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. एक अतिशय विनम्र व तितकाच ताकतीचा डॉक्टर हरपला असल्याची भावना या वेळी सातारकरांनी व्यक्त केली आहे.
श्री बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे म्हणाले, डॉ. रविंद्र हर्षे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा केली. आज त्यांच्या अस्थींचे पाण्यामध्ये विसर्जन न करता वृक्षारोपण करतेवेळी त्यांच्या आस्थीचा वापर करण्यात आला. भविष्यात झाडाच्या रूपाने डॉ. रविंद्र हर्षे लोकांना सावली व आक्सिजन देणार असून आम्ही हर्षे कुटुंबियांच्या या निर्णयाचे आभार मानतो.





