Fog Effect: लग्न समारंभामध्ये धुक्याच्या इफेक्टचा वापर करताय? अति संपर्क ठरू शकतो धोकादायक
Fog Effect: धुक्याच्या इफेक्टसाठी समारंभात वापरले जाणारे रसायन घातक

स्वरुपा जाधव
पिंपरी – लग्न समारंभ, वाढदिवस, रिसेप्शन आणि इतर कार्यक्रमांमध्ये आकर्षक वातावरण तयार करण्यासाठी कृत्रिम धुक्याचा (फॉग इफेक्ट) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या फॉग मशीनमध्ये पाण्यासोबत प्रॉपिलीन ग्लायकॉल हे द्रव्य मिसळले जाते.
तज्ज्ञांच्या मते, मर्यादित प्रमाणात याचा वापर सुरक्षित मानला जातो. मात्र, वारंवार किंवा जास्त प्रमाणात त्याच्या संपर्कात आल्यास काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. प्रॉपिलीन ग्लायकॉल हे रंगहीन, गंधहीन आणि किंचित गोड चवीचे द्रव आहे. ते पाण्यात सहज मिसळते आणि हवेतून ओलावा शोषून घेण्याचा गुणधर्म त्यात असतो.
औद्योगिक आणि व्यावसायिक कूलिंग सिस्टीममध्येही प्रॉपिलीन ग्लायकॉल पाण्यासोबत मिसळून कूलंट म्हणून वापरले जाते. हे पाणी थंड करण्यासाठी नसून, उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम करते. तसेच कमी तापमानात द्रव गोठू नये, गंज कमी व्हावा आणि कूलिंग सिस्टीमची कार्यक्षमता टिकून राहावी यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
त्यामुळे (एच व्ही ए सी) प्रणाली, चिलर्स, कोल्ड स्टोरेज, डेटा सेंटर्स तसेच फूड आणि बेव्हरेज उद्योगांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. काही लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉग मशीनमध्येही पाण्यासोबत प्रॉपिलीन ग्लायकॉल मिसळून कृत्रिम धुक्याचा परिणाम तयार केला जातो.
आरोग्यावर होणारे परिणाम
तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीसाठी मर्यादित प्रमाणातील प्रॉपिलीन ग्लायकॉल सुरक्षित मानले जाते. शरीरात गेल्यानंतर त्याचे विघटन होऊन ते नैसर्गिक प्रक्रियेद्वारे बाहेर टाकले जाते. मात्र, किडनी, लिव्हरचे विकार असणारे रुग्ण, लहान मुले, गरोदर महिला यांना प्रॉपिलीन ग्लायकॉलचे अधिक सेवन केल्याने त्रास होण्याची शक्यता असते.
जास्त प्रमाणात सेवन किंवा वारंवार संपर्क आल्यास डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, त्वचेवर लालसरपणा, खाज किंवा जळजळ यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अतिप्रमाणात संपर्क राहिल्यास मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
फॉग मशीन वापरताना सभागृहात योग्य वायुवीजन असणे आवश्यक आहे. धुक्याच्या थेट संपर्कात दीर्घकाळ राहणे टाळावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
कशा-कशात होतो वापर ?
याचा वापर फक्त फॉग मशीनमध्येच होत नसून अन्न, औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये ही याचा वापर केला जातो. जसे की केक, आइस्क्रीम, सॅलड ड्रेसिंग, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्लेवर्ड कॉफी, काही बेकरी पदार्थ, खोकल्याची औषधे, मॉइश्चरायझर, फेस क्रीम, सनस्क्रीन, शॅम्पू, कंडिशनर, डिओडरंट, लिपस्टिक, शेव्हिंग क्रीम, इलेक्ट्रॉनिक सिगारेट तसेच काही रंग (पेंट) तयार करण्यामध्येही याचा वापर केला जातो. हे पदार्थातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, इतर घटक मिसळण्यासाठी आणि उत्पादनाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी उपयोगी ठरते.
Pune District : अश्व धावे अश्वामागे… तुकोबांच्या स्वागतासाठी तोफांची सलामी आणि पुष्पवृष्टी





