Pune District : अश्व धावे अश्वामागे… तुकोबांच्या स्वागतासाठी तोफांची सलामी आणि पुष्पवृष्टी
Pune District : अकलूज नगरपरिषदेने शहरात वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी उत्तम सोयी-सुविधा पुरवल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

अकलूज : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि. २०) सकाळी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. अकलूज येथे तोफांची सलामी, फटाक्यांची आतिषबाजी आणि तीन जेसीबीच्या साहाय्याने केलेली भव्य पुष्पवृष्टी अशा उत्साही वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी, पालखी सोहळ्यातील श्री तुकोबारायांच्या पादुकांना नीरा नदीत भावपूर्ण वातावरणात नीरास्नान घालण्यात आले. त्यानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर सोहळ्याचे पहिले नयनरम्य गोल रिंगण पार पडले.
सकाळी ९:१५ वाजता पालखीचे अकलूज हद्दीतील गांधी चौकात आगमन झाले. तेथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, नगराध्यक्षा रेशमा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, मुख्याधिकारी सचिन पाटील व माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर पालखी विठ्ठल मंदिराकडे ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली.
सकाळी १०:१५ वाजता सदुभाऊ चौकातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचे आगमन झाले. पालखीची पाद्यपूजा, आरती व देवाच्या अश्वाचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील व ऋतुजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वरूपाराणी मोहिते-पाटील व सयाजीराजे मोहिते-पाटील उपस्थित होते. अश्वाचे पूजन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह मोहिते पाटील परिवारातील सदस्य, शासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सोहळ्यातील प्रमुख व विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला. अकलूज नगरपरिषदेने शहरात वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी उत्तम सोयी-सुविधा पुरवल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
प्रशासकीय सूत्रांचे हस्तांतरण
सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वाळके, प्रांताधिकारी पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजाळ, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर आदींनी पालखीचे स्वागत केले. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, प्रांताधिकारी उत्तम दिघे व इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी पालखी सोहळ्याची सूत्रे सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली.
‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष
सकाळी ११ वाजता रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. सुरुवातीला पताकाधारकांनी तीन फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर तुळशीधारक व हंडेकरी महिला, वीणेकरी आणि टाळकरी वैष्णवांनी धावत फेरी पूर्ण केली. शेवटी दोन्ही अश्वांनी रिंगणात पाच फेऱ्या पूर्ण करताच उपस्थितांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा एकच जयघोष केला. अश्वांच्या टापांखालील पवित्र माती कपाळी लावण्यासाठी वैष्णवांची अलोट गर्दी झाली होती. या वेळी मैदानावर फुगडीसह विविध पारंपरिक खेळही सादर करण्यात आले.
पालखी सोहळ्यासाठी चोख नियोजन
शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील व सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी रिंगण सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन केले. रिंगण सोहळ्यानंतर पालखी याच ठिकाणी मुक्कामी असल्याने दर्शन रांग उभारण्यात आली असून, यासाठी संस्थेचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, आपत्कालीन कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष, तसेच वैष्णवांच्या निवासासाठी खोल्या व तंबू उभारण्यात आले आहेत. मैदानावर चिखल होऊ नये यासाठी मुरमीकरण करण्यात आले असून, लाखो वैष्णवांना सोहळा अनुभवता यावा यादृष्टीने सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.





