Satara: दिवाळीसाठी सातारा विभागाच्या १६३ जादा बससेवांचे नियोजन
Satara पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वारगेट मार्गावर सर्वाधिक ११७ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा आगारातून २७, कराडमधून १३, कोरेगावमधून आठ, वाईमधून १४, पाटणमधून सात, दहिवडीतून पाच आणि महाबळेश्वरमधून सहा बसेस सोडण्यात येणार आहेत.

Satara: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. येत्या दि. ४ ते २२ नोव्हेंबरदरम्यान विविध मार्गांवर एकूण १६३ जादा बसेस धावणार असून, मुंबई- पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दिवाळीच्या काळात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त परगावी राहणारे नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी येतात. त्याचबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक जण पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे प्रवास करतात. त्यामुळे नियमित बसफेऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन सातारा विभागातील ११ आगारांमार्फत अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे मुंबईवर भर
पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वारगेट मार्गावर सर्वाधिक ११७ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा आगारातून २७, कराडमधून १३, कोरेगावमधून आठ, वाईमधून १४, पाटणमधून सात, दहिवडीतून पाच आणि महाबळेश्वरमधून सहा बसेस सोडण्यात येणार आहेत. फलटण, मेढा, खंडाळा आणि पारगाव या आगारांतूनही जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
लांब पल्ल्याच्या मार्गांवरही अतिरिक्त वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईसाठी १०, तर परळ, ठाणे आणि बोरिवली मार्गांवर प्रत्येकी पाच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय सोलापूर, कोल्हापूर, शिर्डी, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट, नांदेड, लातूर, अलिबाग आणि अन्य मार्गांवरही जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवाशांना लाभ घ्यावा- ज्योती गायकवाड
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळणे, गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देणे, हा या नियोजनाचा उद्देश आहे. प्रवाशांनी उपलब्ध जादा बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विभागाच्या विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे.





