Independence Day Fashion Tips : स्वातंत्र्यदिनाचा तिरंगा लूक करताय? ‘या’ 10 चुका करू नका; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन…
१५ ऑगस्टला तिरंग्याच्या रंगांत सजायचं असेल, तर ‘देशभक्ती दिसली पाहिजे, पण राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये’ हा साधा नियम लक्षात ठेवा.

Independence Day Fashion Tips : १५ ऑगस्ट जवळ आला की देशभरात देशभक्तीचा रंग चढू लागतो. घरांपासून शाळा-महाविद्यालयांपर्यंत आणि सोशल मीडियापासून ऑफिसच्या कार्यक्रमांपर्यंत सर्वत्र ‘तिरंगा’ दिसू लागतो. स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनमध्ये आपल्या लूकमधूनही देशप्रेम व्यक्त करण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
त्यामुळे अनेकजण केसरी, पांढरा आणि हिरवा या रंगांच्या कपड्यांची निवड करतात. कुणी तिरंग्याच्या रंगाची साडी नेसतं, कुणी कुर्ता-दुपट्ट्याचं कॉम्बिनेशन करतं, तर तरुणाई जॅकेट, टी-शर्ट, स्कार्फ किंवा ॲक्सेसरीजमधून ‘पॅट्रियॉटिक लूक’ साधते.
पण देशभक्तीचा लूक आणि प्रत्यक्ष राष्ट्रध्वजाचा वापर यात मोठा फरक आहे. फॅशनच्या नादात राष्ट्रध्वजाचा अनादर होणार नाही, याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण भारतीय राष्ट्रध्वजाचा वापर आणि प्रदर्शन याबाबत Flag Code of India, 2002 आणि Prevention of Insults to National Honour Act, 1971 अंतर्गत नियम आहेत. गृह मंत्रालयानेही राष्ट्रध्वजाच्या सन्मानाने वापराबाबत नागरिकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
म्हणूनच १५ ऑगस्टला तिरंग्याच्या रंगांत सजायचं असेल, तर ‘देशभक्ती दिसली पाहिजे, पण राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये’ हा साधा नियम लक्षात ठेवा. तिरंग्याच्या रंगांचा वापर करून सुंदर, स्टायलिश आणि सन्मानपूर्वक लूक कसा तयार करायचा आणि कोणत्या चुका कटाक्षाने टाळायच्या, जाणून घ्या…
तिरंग्याचा परफेक्ट लूक कसा कराल?
१. पांढऱ्या रंगाला द्या बेस
तिरंग्याच्या रंगांमध्ये पांढरा रंग बेस म्हणून ठेवला तर लूक अधिक एलिगंट दिसतो. पांढरी साडी, कुर्ता, शर्ट किंवा टॉप यावर केसरी आणि हिरव्या रंगाचे छोटे टच देता येतात.
उदाहरणार्थ, पांढरी साडी + केसरी ब्लाऊज/दुपट्टा + हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा इअररिंग्स असा लूक आकर्षक दिसू शकतो.
२. वेस्टर्न लूकमध्येही करता येईल प्रयोग
पांढरा टॉप किंवा शर्ट, त्यावर केसरी किंवा हिरव्या रंगाचं जॅकेट, स्कार्फ किंवा स्टोल असा साधा कॉम्बिनेशन करता येईल. पुरुषांसाठी पांढरा कुर्ता किंवा शर्ट आणि त्यासोबत केसरी किंवा हिरव्या रंगाची ॲक्सेसरी हा देखील चांगला पर्याय आहे.
३. ॲक्सेसरीजमधून द्या तिरंग्याचा टच
पूर्ण ड्रेस तिरंग्याच्या रंगात करण्याची गरज नाही. बांगड्या, ब्रेसलेट, इअररिंग्स, हेअर क्लिप, ब्रोच किंवा छोटा बॅज अशा ॲक्सेसरीजमधूनही देशभक्तीचा रंग दाखवता येतो.
मात्र सगळ्या ॲक्सेसरीज एकाच वेळी वापरण्याचा अट्टहास करू नका. लूक साधा आणि संतुलित ठेवला तर तो अधिक आकर्षक दिसतो.
‘या’ 10 चुका अजिबात करू नका!
१. राष्ट्रध्वज थेट कपड्यांवर वापरू नका
हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. राष्ट्रध्वजाची प्रतिमा/रूप कपडे, ड्रेस मटेरियल, रुमाल, नॅपकिन आदींवर छापणे किंवा भरतकाम करणे नियमबाह्य ठरू शकते.
कायद्यात राष्ट्रध्वजाचा पोशाखाचा भाग म्हणून वापर आणि ड्रेस मटेरियलवर त्याची छपाई/भरतकाम करण्याबाबत स्पष्ट निर्बंध आहेत.म्हणून ‘तिरंग्याचे रंग’ वापरा; पण प्रत्यक्ष राष्ट्रध्वज कपड्यासारखा वापरू नका.
२. तीनही रंगांचा अतिरेक टाळा
केसरी, पांढरा आणि हिरवा हे तीनही रंग एकाच वेळी डोक्यापासून पायापर्यंत वापरल्यास लूक अतिशय भडक दिसू शकतो. एका रंगाला बेस ठेवून उर्वरित दोन रंग ॲक्सेंट म्हणून वापरणे अधिक स्मार्ट ठरेल.
३. राष्ट्रध्वज कंबरेखाली वापरू नका
राष्ट्रध्वजाचा पोशाख, युनिफॉर्म किंवा ॲक्सेसरीचा भाग म्हणून कंबरेखाली वापर करण्यास कायद्यात मनाई आहे. त्यामुळे पँट, स्कर्ट, शॉर्ट्स, पायमोजे किंवा पादत्राणांवर प्रत्यक्ष राष्ट्रध्वजाची प्रतिमा वापरणे टाळा.
४. तिरंगा रंग म्हणजे राष्ट्रध्वज नव्हे!
केसरी-पांढरा-हिरवा रंगांचा साधा ड्रेस आणि अशोकचक्रासह प्रत्यक्ष राष्ट्रध्वजाची प्रतिमा यामध्ये फरक आहे. त्यामुळे फॅशन करताना हा फरक लक्षात ठेवा. तीन रंगांच्या कपड्यांवर अशोकचक्राची हुबेहूब प्रतिमा देऊन त्याला राष्ट्रध्वजाचा आकार देणे टाळणे अधिक योग्य.
५. पादत्राणांवर राष्ट्रध्वजाची प्रतिमा नको
चप्पल, शूज, स्लीपर किंवा मोज्यांवर राष्ट्रध्वजाची प्रतिमा वापरणे टाळा. विशेषतः पायाखाली जाणाऱ्या वस्तूंवर राष्ट्रध्वजाचा वापर करणे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाच्या दृष्टीने अयोग्य आहे.
६. तिरंगा रंगाचा दुपट्टा किंवा स्कार्फ जमिनीवर पडू देऊ नका
जर तुम्ही फक्त केसरी-पांढरा-हिरव्या रंगाचा स्कार्फ किंवा दुपट्टा वापरत असाल, तर तो जमिनीवर ओढला जाणार नाही याची काळजी घ्या. प्रत्यक्ष राष्ट्रध्वज जमिनीला किंवा पाण्यात जाणूनबुजून स्पर्श करू देणे निषिद्ध आहे.
७. फाटके किंवा अस्वच्छ कपडे वापरू नका
देशभक्तीचा लूक करताना कपडे स्वच्छ आणि नीटनेटके असणं महत्त्वाचं आहे. विशेषतः प्रत्यक्ष राष्ट्रध्वजाचा वापर करत असल्यास तो खराब, मळलेला किंवा विस्कटलेला असू नये; गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खराब किंवा विस्कटलेला राष्ट्रध्वज प्रदर्शित न करण्याचे नमूद आहे.
८. मेकअपमध्येही अतिरेक नको
तिरंग्याच्या रंगांचा आयशॅडो, नेल आर्ट, लिपस्टिक, बिंदी आणि इतर सर्व गोष्टींमध्ये एकाच वेळी वापर केल्यास लूक ओव्हर होऊ शकतो. मेकअप साधा ठेवा आणि एखाद्या एका छोट्या डिटेलमधून तिरंग्याचा टच द्या.
९. राष्ट्रध्वजाला सजावटीची वस्तू समजू नका
राष्ट्रध्वजाचा वापर टेबलक्लॉथ, पडदा, कव्हर, सजावटीची चादर किंवा कोणतीही झाकण्यासाठीची वस्तू म्हणून करता येत नाही. त्याचप्रमाणे वाहनावर राष्ट्रध्वज अशा पद्धतीने लपेटणे किंवा झाकण्यासाठी वापरणेही नियमांच्या विरोधात आहे.
१०. फोटो आणि सोशल मीडिया कंटेंट करताना काळजी घ्या
आजकाल स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रील्स, फोटोशूट आणि सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. अशावेळी राष्ट्रध्वजाचा वापर फक्त फोटो अधिक ‘देशभक्तीपूर्ण’ दिसावा म्हणून करू नका. फोटो काढताना ध्वज जमिनीवर पडणार नाही, त्याचा अवमान होणार नाही किंवा तो चुकीच्या पद्धतीने वापरला जाणार नाही, याची काळजी घ्या.





