Plane Crash Case: अजित पवार अपघात प्रकरण संसदेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या – “डेप्युटी सीएमलाच न्याय नसेल, तर सामान्यांचे काय?”
Plane Crash Case: या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि वेळेत चौकशी करून विमानातील पायलट तसेच सर्व संबंधितांना न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.

Plane Crash Case: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास दोन महिने पूर्ण झाले असतानाही तपास प्रलंबित असल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी झिरो अवरमध्ये हा विषय मांडत केंद्र सरकारकडे पारदर्शक चौकशीची मागणी केली.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर माहिती देत म्हटले की, अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रभावी मांडणी केली असून सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी.
“दोन महिने झाले, न्याय कुठे?”
झिरो अवरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “२८ जानेवारी रोजी माझ्या भावाचे विमान कोसळले. आज दोन महिने झाले, पण आमच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. एखाद्या घरातील कर्ता पुरुष गमावण्याचे दुःख काय असते, हे आम्ही अनुभवले आहे. सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्यालाच न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुळे यांनी एफआयआर नोंदविण्यास झालेल्या विलंबावरही टीका केली. “माझ्या भावाचा मुलगा रोहित पवार यांना एफआयआर दाखल करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये जाऊन विनंती करावी लागली. महाराष्ट्रातही तत्काळ दखल घेण्यात आली नाही. एका मोठ्या नेत्याच्या अपघातातही एफआयआर होत नसेल, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“प्रत्येक अपघाताची समान चौकशी व्हावी”
सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे केवळ त्यांचे भाऊ नव्हते, तर महाराष्ट्रातील जनतेचेही लाडके नेते होते. “अशा मोठ्या अपघाताची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मग तो अहमदाबादमधील विमान अपघात असो, हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपिन रावत यांचा मृत्यू असो, झारखंडमधील एअर अॅम्ब्युलन्स दुर्घटना असो किंवा अजित पवार यांचा अपघात — सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अजितदादांना न्याय मिळावा यासाठी आज खा. सुप्रियाताई यांनी झिरो अवरमध्ये अंत्यत तळमळीने आणि प्रभावी शैलीत संसदेत या विषयाची मांडणी करुन अजितदादांना न्याय देण्याची मागणी सरकारकडं केली. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं, ही विनंती..!… pic.twitter.com/tzJUiRm4k3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 27, 2026
‘ब्लॅक बॉक्स’वरही प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील ‘ब्लॅक बॉक्स’बाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. “आधी ब्लॅक बॉक्स मिळेल असे सांगितले, नंतर तो खराब असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत,” असे सुळे म्हणाल्या. तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर निवेदन दिल्याचा उल्लेख करत त्यांनी चौकशी ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याची मागणी केली.
या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि वेळेत चौकशी करून विमानातील पायलट तसेच सर्व संबंधितांना न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.





