Pimpri : मावळला मंत्रिपद मिळावे यासाठी आकाशात झळकावले फलक

वडगाव मावळ : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत सलग दुसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली. त्याचवेळी मावळमधील ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकावत आमदार शेळके यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केलेल्या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे.
मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक आणि त्यांच्या टीमने या अनोख्या उपक्रमाची धुरा सांभाळली. या उपक्रमात पंकज गुगळे, प्रवीण शिंदे, भाऊ गायकवाड, बाळासाहेब कुडले, गणेश शिंदे, गणपत नेवाळे, विकास शेलार, सनी कोळेकर, योगेंद्र भुल, दत्ता कोंढरे, दत्ता म्हाळसकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मावळातील नागरिक आमदार शेळके यांच्या रुपाने मंत्रीपदाची वाट पाहत असून मावळ तालुका हा विकासाच्या उड्डाणासाठी तयार असल्याचा संदेश यातून देण्यात आला.





