Nevasa : भेंडा बुद्रुकच्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था; नागरिकांनी व्यक्त केला संताप
Nevasa News : पत्रेही खाली आलेले आहेत लोखंडी सांगाडा पण वाकलेला दिसून येत आहे. आजूबाजूला झाडे झुडपही वाढलेली आहेत. अंत्यसंस्काराला येणाऱ्या नातेवाईकांना उन्हात-पावसात उभं राहावं लागत आहे.

नेवासे : माणसाला शेवटचा निरोप देताना तरी सन्मान मिळावा ही सर्वसामान्य माणसांची साधी अपेक्षा असते पण भेंडा बुद्रुकमध्ये (ता.नेवासा) येथे मात्र ही अपेक्षाच धुळीस मिळालेली आहे. गावातील एका स्मशानभूमीतील शेड गेल्या दोन – तीन वर्षांपासून कोसळलेल्या अवस्थेत पडून आहे. पत्रेही खाली आलेले आहेत लोखंडी सांगाडा पण वाकलेला दिसून येत आहे. आजूबाजूला झाडे झुडपही वाढलेली आहेत. अंत्यसंस्काराला येणाऱ्या नातेवाईकांना उन्हात-पावसात उभं राहावं लागत आहे.
एकाच गावात दोन नियम का?
गावात दोन स्मशानभूमी आहेत.एकीकडे एक स्मशानभूमी स्वच्छ, सुशोभित, सगळ्या सोयींनी सजलेली तर दुसरीकडे दुसरी स्मशानभूमीचे शेड कोसळलेल आहे. इथे मात्र चौहीकडे अस्वच्छता आणि अंधार घेऊन अखेरच्या घटका मोजते आहे. शनिवार,२८ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा ठरली होती. ग्रामस्थांनी स्मशानभूमीसह अनेक प्रश्न मांडायची तयारीही केलेली होती पण कोरम पूर्ण न झाल्याने अखेर सभा तहकूब झाली आणि गावाचे अनेक प्रश्न जैसे थेच राहिलेले आहेत.
ग्रामस्थांची मागणी काय?
कोसळलेल्या शेडची तातडीने पुनर्बांधणी करून परिसराची स्वच्छता व नियमित देखभाल करावी. पाणी, वीज, प्रकाशव्यवस्था गेल्या ५ वर्षांत दोन्ही स्मशानभूमींसाठी किती निधी आला, किती खर्च झाला याचा जाहीर खुलासा करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.





