“बारमाही शेतरस्त्यांसाठी पथदर्शी पाऊल; २३ सदस्यीय समिती स्थापन”

Rural Farm Roads : राज्य सरकारने शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शेतमालाची सुलभ वाहतूक आणि शेतीच्या यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी बारमाही शेतरस्त्यांचे नियोजनबद्ध विकास सुनिश्चित करेल.
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून, ती एका महिन्यांत आपला अहवाल सादर करेल.
समितीत ग्रामविकासमंत्री, रोजगार हमी योजनामंत्री, वित्त, नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री, विधानसभेचे पाच सदस्य, सात विशेष आमंत्रित सदस्य आणि सात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शेतीसाठी यंत्रसामग्रीच्या वाढत्या वापरामुळे चांगल्या रस्त्यांची गरज लक्षात घेता, शेतरस्त्यांची गुणवत्ता आणि मजबुती सुधारण्यावर या समितीचा भर असेल. यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होईल, शाश्वत शेतीविकासाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन व वाहतुकीच्या अडचणींवर मात करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. समितीच्या शिफारशींमुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि शेती क्षेत्राला नवे बळ मिळेल.

