Pimpri : तरुणाईने महापुरुषांमधील क्षमता, सामर्थ्य अंगिकारल्या पाहिजेत: प्रा. नितीन बानगुडे

सांगवी : आजच्या तरुणाईने महापुरुषांमधील क्षमता, सामर्थ्य या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. तसेच स्वतः ची क्षमता ओळखून जागृत राहावे, असे आवाहन व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
जुनी सांगवी येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन आयोजित संयुक्त जयंती महोत्सवात आयोजित व्याख्यानात चला नवी पिढी घडवूया या विषयावर ते बोलत होते. यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, प्रा.राजाभाऊ भैलुमे, डॉ.प्रकाश रोकडे, यश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाराथे, बाळासाहेब सोनवणे, रविंद्र यादव, संस्थेचे अध्यक्ष संतोष कांबळे, सुर्यकांत वराडकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, धर्म, भाषा, प्रांत हे भेद विसरून एकत्र येण्याची भावना रयतेच्या मनात रुजविली. हाच वारसा भारताला महासत्तेकडे घेऊन जाऊ शकतो. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, दत्तक मूल, गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला.
तर वर्णव्यवस्थेला विरोध, दलितांना शिक्षण देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गावकुसाबाहेरील दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा उत्कर्ष केला. युवकांमधील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पालकांनी मुलांवर योग्य संस्कार करायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माची माणसं सोबत घेऊन पुढे गेले. त्यांनी माणसा-माणसात भेद केला नाही. परस्त्रीचा मातेसमान आदर राखणे ही त्यांची शिकवण आहे. मात्र आजची पिढी नक्की कोणत्या दिशेने जातेय? हा प्रश्न उपस्थित होतो. ही चिंताजनक बाब आहे.
महापुरुषांनी सांगितलेले प्रज्ञा, शील, करुणा, शिक्षण हे गुण अंगीकरून त्यांचे विचार अमलात आणून समाजपरिवर्तनासाठी कष्ट घेणे आवश्यक आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊनच समाजविकास साधता येतो, हेच या महापुरुषांच्या कृतीतून स्पष्ट दिसते. समाजहितासाठी त्यांच्या विचारांचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचेही प्रा. बानगुडे यांनी सांगितले.
सांगवी : संयुक्त जयंती महोत्सवात मार्गदर्शन करताना प्रा. नितीन बानगुडे-पाटील. यावेळी उपस्थित नागरिक.





