Pimpri : जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्यात

पिंपरी : निगडी येथील त्रिवेणीनगरमार्गे नाशिक महामार्ग तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडील विशेष भूसंपादन विभागाने १५ फेब्रुवारी रोजी संबंधित जागेचा ताबा हस्तांतरित केल्यानंतर महापालिकेने उर्वरित रस्त्याचे काम तातडीने केले आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा हा रस्ता ७५ मीटर रुंद आहे. सध्या तो ३७ मीटर रुंद विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद (तीन लेन), मध्यभागी ९ मीटर रुंदीचा उच्च क्षमतेचा मास ट्रान्झिट रूट आणि दोन्ही बाजूंनी २ मीटर रुंदीचे पेव्ह शोल्डर आहेत. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून एकूण ४५० मीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन अशा एकूण सहा लेनचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय, उर्वरित कामे जलद गतीने सुरू असून लवकरच पूर्ण क्षमतेने रस्ता सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून पुणे–नाशिक आणि जुन्या मुंबई–पुणे महामार्गाशी होणारे दळणवळण सुधारण्यास मदत होईल. मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक कमी होण्यामुळे पर्यावरणपूरक वातावरण राहील.
तसेच प्रवाशांचा वेळ व इंधन बचतीस मदत होईल. हा रस्ता तळवडे आयटी पार्क मार्गे चाकण एमआयडीसीला जोडण्यात महत्वाचा दुवा ठरणार आहे. अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने रस्ता विकसित केल्यामुळे जलनिसारण संबंधी समस्या कमी होतील आणि अपघाताच्या घटनांमध्ये देखील घट होणार असल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.





