Pimpri : लग्नाचे अमिष दाखवून महिलेची तीन कोटींची फसवणूक

पिंपरी : शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून ओळख झालेल्या एकाने विवाह इच्छुक महिलेला विविध कारणे देत तिची तब्बल तीन कोटी १६ लाख ७८ हजार ११३ रुपयांची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.
ॲक्सिल दलिप, (यूएसए मोबाइल नं. +१ ४२४-४६५-८८१२, बँक मॅनेजर अजित अहमद (दुबई मोबाइल नं. +९७१ ५२ ४३९ २३५९, बँक अकाऊंट ओपन करून देणारी मारिया रिकार्डो (व्हेनेझुएला मोबाइल.नं. +९७१ ५५ ८७९ ६६२७), जोसेफ शर्मा (दिल्ली मोबाइल नं. +९१ ९८७११ ७१५९३), इमिग्रेशन ऑफिसर म्हणून बोलणारी व्यक्ती (मोबाइल नं. +९० ५४६ ७२६ १९७७), आणि सर्व बँक अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वाकड येथे राहणार्या महिलेने गुरुवारी (दि. १३) याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ११ जून २०२३ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत वाकड येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ओळख आरोपीशी शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून झाली. आरोपी याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. व्यावसायिक अडचणी दूर करण्याकरीता, दुबई येथे FXE CAPITALS BANK खाते रेग्यूलराईज करण्यासाठी, त्याच्या आजारपणाच्या उपचारासाठी, त्याने लोकांकडुन घेतलेले कर्ज फेडण्याकरीता, कस्टम क्लिअर्रसची रक्कम, दुबई ते दिल्ली या प्रवासाचा एकूण खर्च, प्रतिनिधी म्हणून काम केल्याचे पैसे, त्याच्या व्हेनेझुएला ते दुबई प्रवासाचा खर्च, त्याला टर्की इस्ताबुल एअरपोर्ट येथे डिटेन केल्यानंतर रिलीज करण्यासाठी पैसे, अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी महिलेकडून तब्बल तीन कोटी १६ लाख ७८ हजार ११३ रुपयांची फसवणूक केली.





