Pimpri : पालिका एक हजार कोटींचा टप्पा गाठणार का?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी वसुलीचे उदिष्ट दिलेले आहे. विभागाकडून आज अखेर ८३५ कोटी रुपयांचा मालमत्ताकर वसूल झाला आहे. मात्र, उदिष्ट पूर्ण करण्यासाठी फक्त १७ दिवस उरले असून १६५ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान विभागासमोर आहे. त्यामुळे वसुलीचे उदिष्ट पूर्ण करून महापालिका एक हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर मिळवणार का, हे पाहावे लागणार आहे.
कर संकलन विभागाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्या सील करण्याची कारवाई तीव्र केली आहे. प्रतिसाद न देणार्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदार कंपन्या, कारखाने, शॉपिंग मॉल, पेट्रोल पंप, रूग्णालय, शाळा, महाविद्यालय, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल तसेच, निवासी मालमत्ता सील केल्या आहेत.
कारवाईनंतर थकबाकीदार बिल भरत आहेत. त्या मालमत्तेचे सील काढण्यात येत आहे. तसेच, ५० हजार व त्या पेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्तांकडून वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तसेच, नळजोडही खंडित करण्यात आले आहेत. एसएमएस आणि फोन करून थकबाकीदारांना बिल भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्याला काही मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
आत्तापर्यंत एकूण ५ लाख ४ हजार ९०० मालमत्ताधारकांनी एकूण ८३५ कोटी ८१ लाख रूपयांचा भरणा केला आहे. कर संकलन विभागास १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात १ हजार कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यामुळे उर्वरित १७ दिवसांत करसंकलन विभागास तब्बल १६५ कोटी रूपयांची वसुली करावी लागणार आहे. त्यासाठी मार्च महिन्यातील अखेरच्या काही दिवसांत महापालिका करसंकलन विभागाकडून वसुली व कारवाई मोहिम तीव्र केली जाणार आहे.
वाकडमधून सर्वाधिक, तर पिंपरीत सर्वात कमी भरणा
वाकड विभागीय कार्यालयात सर्वांधिक ६७ हजार २६१ मालमत्ताधारकांनी सर्वाधिक ११४ कोटी ३५ लाख रूपयांचा भरणा केला. त्यापाठोपाठ थेरगाव ७४ कोटी ६२ लाख, चिखली ७२ कोटी ५६ लाख, भोसरीत ५८ कोटी २ लाख, सांगवी ५४ कोटी ६८ लाख, चिंचवड ५३ कोटी १४ लाख, पिंपरी गावात ४९ कोटी ७५ लाख, किवळेत ४८ कोटी ९६ लाख, मोशीत ४८ कोटी ४ लाख, आकुर्डीत ३९ कोटी ६७ लाख, महापालिका भवन ३८ कोटी ८६ लाख, कस्पटे वस्ती ३६ कोटी ७९ लाख, फुगेवाडी, दापोडी- २६ कोटी ३९ लाख, चर्होली- २५ कोटी ६ लाख, दिघी, बोपखेलमध्ये २५ कोटी २१ लाख रूपयांचा कराचा भरणा झाला आहे. सर्वांत कमी तळवडेत २१ कोटी ४२ लाख, निगडी-प्राधिकरणात १८ कोटी २१ लाख आणि पिंपरी कॅम्पात ७ कोटी ११ लाख रूपयांचा भरणा झाला आहे.
कर वसुलीची सद्यस्थिती-
एकूण मालमत्ताधारक- ६ लाख ३५ हजार
कर भरणारे – ५ लाख ४ हजार ३८८
जमा कर – ८३५ कोटी ८१ लाख
कर न भरणारे – १ लाख ३० हजार ६१२
चालू मालमत्ता कर व थकबाकी वसुलीसाठी जनजागृती, तसेच कारवाई मोहिमा राबवून प्रयत्न करण्यात येत आहे. आर्थिक वर्षाअखेरीस अधिकचा भरणा होऊन जास्तीत जास्त मालमत्ता कर वसूल होईल. थकबाकीदारांनी भरणा न केल्यास त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई प्रस्तावित आहे.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका





