Pimpri : कामचुकार पदाधिकार्यांना दाखवणार घरचा रस्ता

पिंपरी : राज्यामध्ये आपली एक संघटना आहे, ती आपल्याला मजबूत करायची आहे. येत्या दोन दिवसांत संघटनात्मक बांधणी करणार आहे. त्यानंतर एक यंत्रणा वरपासून खालीपर्यंत लक्ष ठेवेल. एक महिन्यामध्ये जो पदाधिकारी कामचुकारपणा करतोय असे वाटेल त्याला पदावरून काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (दि. ९) दिला. मनसेची स्थापना होऊन १९ वर्ष झाले असून त्यानिमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे यांनी पक्षसंघटना, पुढील ध्येय धोरणे याबाबत पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अनिकेत प्रभु, उपशहराध्यक्ष ओकांर पाटोळे, प्रतिक शिंदे, विकास कदम, सिद्धेश सोनकवडे, किरण पाटील, शरण्य पाटणे, अक्षय नाळे, सुमित कलापुरे आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता महापालिका निवडणुकांसाठी पक्षाने पूर्ण ताकदीने मैदानात उतारायचे ठरवले आहे. त्यासाठी संघटना मजबूत करणार असून लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आज पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. या वर्षांत अनेक निवडणुका झाल्या. अनेक पराभव बघितले. किती आमदार आले आणि गेले. मात्र, आजही देशातील अनेक पक्षांना मोठा प्रश्न पडला आहे की मनसे या पक्षातील माणसे एवढी एकत्र कशी आहेत? फेरीवाले कष्टाने काम करत असतात. मात्र, हे राजकीय फेरीवाले आज एका फूटपाथवर तर उद्या दुसर्या फूटपाथवर असतात. जो डोळा मारेल त्याच्यामागे हे फेरीवाले निघतात. असा फेरीवाला आपल्याकडे नाही ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला अशा फेरीवाल्यांची गरज नाही, आपण खणखणीत दुकान बांधू असे म्हणत पक्ष बदलणार्यांवर त्यांनी टीका केली.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नियोजन सुरू आहे. यंत्रणा लक्ष ठेवणार असून १५ दिवसाला प्रत्येकाचे काम तपासले जाणार आहे. ज्याला काम करायचे नाही त्यांने कोणत्याही फूटपाथवर जावे. थोड्याच दिवसात जबाबदार्यांचे वाटप केले जाईल. त्याचा चांगला निकाल आपल्याला निवडणुकांमध्ये दिसणार असल्याचे सांगत ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. तसेच ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई येथे शीवतीर्थावर मेळावा होणार असून त्यासाठी राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
महिला दिन जिजाऊ साहेबांच्या नावाने साजरा झाला पाहिजे
महिला दिन साजरा करत असताना एका महिलेचा आपल्याला विसर पडतो. त्यांनी लहानपणी आपले वडील मोगलांकडे चाकरी करत असल्याचे बघितले. लग्न झाल्यावर पतीलाही तसेच बघितले. त्यांनी स्वराज्यासाठी पतीला बंड करायला लावले. स्वराज्याचे स्वप्न त्यांनी त्यांच्या मुलाकडून पूर्ण करून घेतले. त्यामुळे महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने साजरा झाला पाहिजे. आज देशात सर्वात पुढारलेल्या महिला या फक्त महाराष्ट्रातच असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.





