Pimpri : मधमाशांचे पोळे काढायचे कोणी?

पिंपरी : पिंपरी चिंवचड शहरातील हरित पट्ट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यांचीही संख्या वाढत चालली आहे. मात्र सार्वजनिक रस्त्यावर भर वस्तीत झाडाला लागलेले पोळे काढायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मधमाशांचे पोळे काढण्यास अग्निशामक दलाने नकार दिला आहे. तर उद्यान विभागाकडे यंत्रणाच नाही. मग मधमाशांचे पोळे काढायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पृथ्वीतलावरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर माणूस केवळ पुढील चार वर्ष जगू शकतो, असे भाकीत विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी विर्तवले होते. या भाकितावरून मधमाशा पर्यावरणासाठी किती आवश्यक आहे, हे दिसून येते. मधमाशांच्या एका पोळ्यामध्ये २० हजार ते ८० हजार मधमाशा असतात. आपल्या घराच्या संरक्षणासाठी ते मनुष्यांवरही हल्ला करतात हे वेळोवेळी दिसून आले आहे.
जानेवारीत महिन्यात नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु या गर्दीतील काही हुल्लडबाज आणि अतिउत्साही भाविकांनी रंगीत धूराचे फटाके फोडल्याने गडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली आणि संतप्त मधमाशांनी गडावरील भाविकांवर हल्ला चढवला. यामुळे काहीवेळ एकच गोंधळ उडाला होता. मधमाशांच्या या हल्ल्यात काही भाविक जखमी झाले. ही घटना १ जानेवारी रोजी घडली. राज्यात ठिकठिकाणी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात काही जणांचा जीवही गेला आहे.
चिंचवडगावातील पोदार शाळेजवळ पदपथावर असलेल्या एका झाडाला आग्या मोहोळ लागले आहे. शाळा आणि दाट लोकवस्तीचा भाग असल्याने हे पोळे त्याठिकाणी घातक असल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पालांडे यांनी महापालिकेच्या उद्यान व अग्निशामक दलाकडे तक्रार केली. मात्र उद्यान विभागाने आमच्याकडे अशी कोणतीही यंत्रणा नसल्याचे सांगितले. तर अग्निशामक दलाने आम्ही जीव वाचविण्याचे काम करतो, मारायचे नाही. जर त्या पोळ्यावर प्रेशरने पाणी मारले तर हजारो मधमाशा मरून जातील, असे सांगितले. जर त्या पोळ्याला इजा झाली आणि संतप्त माशांनी विद्यार्थी व नागरिकांवर हल्ला केला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी महापालिकेला पत्र पाठवून मधमाशांचे मोहोळ काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पोळे काढणे खर्चिक
मधमाशांचे पोळे काढण्यासाठी एका विशिष्ट समाजाचे लोक आग पेटवून मधमाशा जाळतात आणि मध काढून घेतात. तर पेस्ट कंट्रोलवाले मधमाशांच्या पोळ्यावर विषारी औषध फवारणी करून मधमाशांना मारतात. असे प्रयोग पर्यावरण प्रेमी नागरिकांना नको असतात. मात्र पुण्यातील बी-बास्केट ही संस्था मधमाशांना कोणतीही इजा न करता पोळे काढते. मात्र उंचावर असलेले पोळे काढण्यासाठी आवश्यक असलेले क्रेन आणि मनुष्यबळाचा खर्च असा एकूण तीन ते चार हजार रुपये आकारते. मात्र सार्वजनिक रस्त्यावरील झाडावर असलेले पोळे काढण्यासाठी खर्च कोण करणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.





