Pimpri : जिथून होतो पाणीपुरवठा, तिथेच तुटवडा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या परिसरालाच गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर, विकासनगर या भागांतील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने आणि अनियमित वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. यामुळे या भागांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही भागांमधील नागरिकांना टॅंकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे.
पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक घरांमध्ये पुरेसे पाणी पोहचत नाही. पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी साठवणे कठीण जाते. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे पाणीपुरवठा अधिकच विस्कळीत होतो. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पंपिंग स्टेशन या भागात असून सुद्धा याच भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी या संदर्भात सांगितले की सध्या एक पंप दुरुस्तीसाठी बंद आहे, त्यामुळे दुसऱ्या पंपाच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, दुसरा पंप लवकरच दुरुस्त होईल आणि पुढील ८ ते १० दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. स्थानिक नागरिक किरण राऊत यांनी सांगितले की पहाटे अडीच वाजता पाणी सोडण्यात येते ते पण कमी दाबाने. 8 वाजता पाणी बंद होते त्यामुळे टँकर शिवाय पर्याय नसतो.
सामाजिक कार्यकर्ता ऐश्वर्या तरस यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षपासून या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. 17 मार्च 2023 रोजी आम्ही ह्या संदर्भात पालिकेत हंडा मोर्चा नेला होता. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत. जर हा प्रश्न लवकरात लवकर निकाली नाही काढला तर एक मोठे जन आंदोलन उभे केले जाईल.





