Pimpri : बुलेटराजांचा ‘फटाका’ कधी बंद होणार?

कान्हे : मावळ तालुक्यामध्ये शहराप्रमाणे ग्रामीण भागातही चारचाकी आणि दुचाकीची संख्या वाढली आहे. कान्हे परिसरात सध्या काही बुलेटधारी तरूण नाहक वाहनांचा आवाज करून ध्वनीप्रदूषण वाढवित आहेत. त्यांच्या अशा वृत्तीमुळे नागरिकांना मनस्ताप होत असून अपघाताचा सुद्धा धोका निर्माण होत आहे.
शालेय परिसरालगत असलेल्या ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांच्या आरोग्यावर देखील या बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजाचा दुष्परिणाम होत आहे. तसेच येथील डॉक्टर व कर्मचारी या आवाजाने हैराण झाले आहेत. धूमस्टाइल गाडी चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुणांचे अपघातात जखमी आणि मृत होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
मोटर वाहन कायद्यानुसार १८ वर्षांवरील मुलांना दुचाकी चालविण्याची परवानगी आहे. मात्र, कान्हे परिसरातील रस्त्यांवर शाळकरी अल्पवयीन मुले सर्रास भरधाव वेगाने दुचाकी चालविताना दिसून येत आहेत. कायदा माहीत असतानाही पालक अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. योग्य वय आणि वाहन परवाना मिळाल्यानंतरच मुलांनी वाहन चालविणे अपेक्षित आहे. मात्र, हौस भागविण्यासाठी अनेक पालक मुलांना दुचाकी खरेदी करून देतात.
शहरालगत असलेल्या मुंबई-पुणे महामार्ग असल्याने त्या महामार्गावरील ही अल्पवयीन मुले सुसाट वेगाने गाडी चालविताना दिसून येतात. यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. पालकांना याचा विसर पडला आहे.
बुलेटस्वारांचे कर्णकर्कश हॉर्न
सध्या तरुणाईत बुलेटची केझ आहे. शहरात काही बुलेटस्वार कर्णकर्कश हॉर्न वाजविताना दिसून येतात. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अगोदरच गाडीचा घडकी भरविणारा आवाज, त्यात सायलेन्सरमध्ये विनापरवाना बदल करून फटाक्यांसारखा निघणारा आवाज केला जातो. तसेच कर्णकर्कश स्वरूपाचे हॉर्न वाजविले जात असल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. अशा दुचाकीधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कायद्याचा धाक राहिला नाही
शहरात भरधाव वेगाने गाडी चालविण्याचे व ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे अपघाताची भीती बळावली आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये, अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वडगाव कामशेत पोलिस विभागाकडून अनेकदा देण्यात आला. मात्र, पालक तसेच तरुण याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.





