Pimpri : ‘मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावणार’

देहूगाव : ‘मी एक लाख दहा हजार मतांनी निवडून आलो. आता त्याच प्रमाणात म्हणजे एक लाख दहा हजार झाडे लावणार!’, असा प्रेरणादायी संकल्प आमदार सुनील शेळके यांनी केला. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करीत त्यांनी नागरिकांना ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ हा संदेश दिला.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान, महात्मा फुले प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शेळके बोलत होते.
श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरू अभंग गाथावन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या कार्यकाळात एक लाख दहा हजार झाडे लावणार असल्याची घोषणा केली. कार्यक्रमाला श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप जालिंदर महाराज मोरे, देहूगावच्या नगराध्यक्ष पूजा दिवटे, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह विविध संस्था, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँक्रिटच्या जंगलातून हिरवाईकडे वाटचाल
‘आपण डोंगर फोडतो, काँक्रिटचे रस्ते, पूल उभे करतो. आजूबाजूला फक्त सिमेंटचं जंगल दिसतं. पण झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं ही आता काळाची गरज आहे,’ असे सांगत आमदार शेळके यांनी उपस्थित नागरिकांना जागरूकतेचं आवाहन केलं. देहूतील ‘गाथा वन’ या आठ एकर वनक्षेत्राचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, “हे वनक्षेत्र चांगलं विकसित करा. नगरपालिकेने दोन कर्मचारी द्यावे, पाण्याची सोय करावी. मी जागेला कुंपण घालून देईन.”





