Pimpri : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची प्रतीक्षा कायम

लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची बदली होऊन एक महिना उलटला तरीही अद्याप त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे मागील एक महिन्यापासून लोणावळा उपविभागातील पोलीस ठाणी व हद्दीतील नागरिकांना नव्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.
सध्या खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडगे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे. परंतु, खेड ते लोणावळा हे अंतर अधिक असल्याने त्यांनाही कार्यपूर्ती करताना अडचण होत आहे. दरम्यान लोणावळा उपविभाग सारख्या महत्वाच्या ठिकाणी नव्या अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.
लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण हद्दीतील परिसर हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. तसेच ग्रामीण भागातही घडामोडी घडत असतात. लोणावळा उपविभागात पुणे ग्रामीण पोलीस दलाची वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर अशी चार ठाणी असून हा परिसरही विस्तीर्ण आहे. त्यामुळे महत्वाच्या याठिकाणी नव्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती होणे गरजेचे आहे.
अनेक अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी
पुणे ग्रामीण पोलीस दलात लोणावळा विभागाची उपविभागीय अधिकारी पदाची खुर्ची महत्वाची मानली जाते. या जागेवर येण्यासाठी अनेक बडे अधिकारी इच्छूक असून संबंधितांनी तशी फिल्डिंगही लावल्याचे बोलले जात आहे. अनेक अधिकाऱ्यांनी या पदासाठी मोर्चेबांधणी केली असून राजकीय वशिलेबाजी सुरू असल्याचीही चर्चा होत आहे. दरम्यान अधिवेशन काळात ह्या पदावरील व्यक्तीची नियुक्ती न झाल्याने येत्या काळात हा निर्णय लवकर होईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी काही पोलीस अधिकारी मुंबई पर्यंत पाठपुरावा करीत असल्याचेही बोलले जात आहे.





