Pimpri : मोशी मार्केटमध्ये वाहन चालकांची लूट

मोशी : पिंपरी चिंचवड महापालिकेने एक तासाकरिता दुचाकीला पाच रुपये आणि चारचाकी वाहनाला दहा रुपये पार्किंग दर आकारला जातो. मात्र मोशी येथील मार्केटमध्ये दुचाकी पार्क करण्यासाठी दहा रुपये आकारले जातात.
अनेकजण रस्त्यात कुठेही वाहन पार्क करतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतुकीला शिस्त लागावी, तसेच त्यातून महापालिकेला महसूल मिळावा यासाठी महापालिकेने शहराच्या अनेक भागामध्ये पे अॅन्ड पार्क तयार केले आहे. महापालिकेच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक मॉल व खासगी ठिकाणीही पे अॅन्ड पार्क सुरू केले आहेत. मात्र खासगी पे अॅन्ड पार्कमध्ये नागरिकांची लूट केली जात आहे.
काही पैशांची बचत व्हावी, यासाठी काही नागरिक आठवड्याचा भाजीपाला घेण्यासाठी मोशी येथील मार्केटमध्ये जातात. तर काही फेरीवालेही याठिकाणाहून भाजी खरेदी करून शहराच्या विविध भागात त्याची विक्री करतात. मोशी मार्केटमध्ये पे अॅन्ड पार्कचा ठेका देण्यात आला आहे. येथील ठेकेदाराकडून दुचाकी वाहन पार्किंगसाठी दहा रुपये आकारले जातात. त्यामुळे दोन पैशाची बचत करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पार्किंगचा भूर्दंड पडतो.
मोशी येथील मार्केटमध्ये दुचाकी पार्किंगसाठी दहा रुपयांची आकारणी केली जाते. मात्र पावती देताना भलतीच पावती दिली जाते. या पावतीवर दुचाकी पार्किंगसाठी दहा रुपये शुल्काचा कोणताही उल्लेख केलेला नाही. यामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.





