Pimpri : वडगावची वनराई वणव्यात बेचिराख

मावळ : गेल्या काही वर्षांपासून मावळ तालुक्यातील डोंगरांना वणवा लागण्याच्या घटना वाढल्या असून वणव्यामुळे निसर्ग संपदा नष्ट होत आहे. वडगाव मावळ येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दक्षिणेकडे अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वडगावच्या डोंगरावर दोन दिवसांपूर्वी वणवा लागला होता. बरीच वनसंपदा जळून नष्ट झाल्यावर तो वणवा विझवण्यात स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या भागात वनविभागाची मोठमोठी सागाची झाडे असून सुदैवाने झाडांना आग न लागल्याने शेकडो झाडे वाचली. परंतु यामुळे पुन्हा एकदा वनविभागाचे अपयश उघड झाले आहे.
वडगाव मधून डोंगरवाडीकडे जाणाऱ्या या डोंगरावर विपुल वनसंपदा असून पशुपक्षी जीव वास्तव्य करतात. मागील अनेक वर्षांपासून हाच डोंगर वणव्याच्या भक्षस्थानी पडून बेचिराख होत आहे. परंतु वन विभागाला येथील आग आटोक्यात आणण्यास एकदाही यश आले नाही. तसेच वनवा लागू नये यासाठी कराव्या लागणाऱ्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या इथे दिसत नाहीत.
वडगाव मावळ वन विभागाच्या अंतर्गत येत असणाऱ्या या डोंगराच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. डोंगरावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. डोंगरावर नागरी वस्ती असून अनेक लोक आजही या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांची घरे आहेत. दुभती जनावरे आहेत. या जनावरांचा चारा, त्यावर चालणारी उपजीविका वनवा लागल्याने अचानक खंडित होते. ज्याचा परिणाम सदर कुटुंबांवर होतो. अशावेळी हातावर हात ठेवून अत्याधुनिक साधनसामग्री नसल्याचे कारण देणाऱ्या वनविभागाला कशाचेच भान नसल्याचे स्पष्ट होते.
वनविभागाकडून कुठल्याही उपाययोजना नाही
दरवर्षी या डोंगरावर वणवा लागतो. या पार्श्वभूमीवर वणवा रोखण्यासाठी उपाययोजना करणे, जाळपट्टी घेणे, चर खणणे आदी गोष्टी वनविभागाने केल्याचे निदर्शनास येत नाही. अर्थातच कागदोपत्री अनेक गोष्टी वनविभाग करत असते. या विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार माजला असल्याचा आरोप अनेकदा नागरिकांकडून केला जातो, तरी देखील वन विभागाला याची कसलीच चिंता लागलेली दिसून येत नाही की कार्यात सुधारणा होताना दिसत नाही.
स्थानिकांनी वणवा लागल्याची माहिती दिल्यानंतर मी माझ्या सोबत वनविभागाचे कर्मचारी घेऊन स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सदरची आग कड्याच्या ठिकाणी असल्याने आग विझविणे आव्हानात्मक होते. तरी देखील वेळेत आग विझविल्याने या भागातील मोठी सागाची शेकडो झाडे वाचविण्यास आम्हाला यश आले आहे.
– परमेश्वर कासोळे, वनरक्षक





