Pimpri : वडगाव नगरपंचायतीची ५८ टक्के कर वसुली

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीची वर्ष अखेरीची घरपट्टी व पाणीपट्टी कर वसुली ६ कोटी १५ लाख रुपये झाली असून एकूण वसुलीच्या अवघी ५८ टक्के कर वसुली झाली आहे. अद्यापही वडगावकर नागरिकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी थकल्याने, आता थकबाकी वसुलीसाठी नगरपरिषद कठोर उपाय योजना करणार असल्याचे वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांनी सांगितले.
वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकूण ७ हजार आठशे मिळकती असून त्यांच्याकडे मागील थकबाकी व चालू कर थकबाकी अशी १० कोटी ४६ लाख रुपये कर वसुली होती. वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या कर विभागाकडून अनेक प्रयत्न करूनही नागरिकांनी दाद न मिळाल्याने ४२ टक्के थकबाकी वसुली बाकी आहे. यावर्षी अवघी कर वसूली ६ कोटी १५ लाख रुपये झाली असून वडगाव शहरातील नागरिकांकडे मोठी थकबाकी शिल्लक राहिली आहे.
थकबाकीदारांविरोधात कडक धोरण
नगरपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये पथकातील सर्व कर्मचारी घरोघरी जाऊन कर भरावा, असे आवाहन करत होते. तरीही काही नागरिकांनी या आवाहनाला साथ दिली नाही. नगरपंचायतीकडून काही थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली. त्यामध्ये १२७ जणांचे नळजोड तोडण्यात आले. तसेच थकबाकीदारांना जप्तीपूर्वीच्या नोटीसाही देण्यात आलेल्या आहेत. यापुढे अशा थकबाकीदारांकरिता नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची सेवा, दाखले, थकबाकी भरल्याशिवाय दिले जाणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष संपताच पहिल्या टप्प्यात सर्व पथकातील कर्मचारी पुन्हा थकबाकीदारांच्या घरी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करणार असून दाद न देणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर जप्ती करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांना नगरपंचायतीच्याकडून कोणतीही शासकीय सेवा अथवा दाखले दिले जाणार नाहीत.
– डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत





