Pimpri : उदय सामंत यांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन लोगोचे अनावरण

पिंपरी : भोसरी येथील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने 17 व18 मे दरम्यान पिंपळे गुरव येथे होणार्या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन 2025 च्या लोगोचे अनावरण मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री उदय सामंत यांना महाकाव्यसंमेलनाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली.
मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार तुकाराम काते, संस्थेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, सचिव प्रीती सोनवणे व डॉ.अलका नाईक, संदीप लिंगायत, जगदीश लाड, अनिल जाधव आदी उपस्थित होते.
पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृह येथे होणार्या या दोन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये काव्य ग्रंथ दिंडी, एकाच वेळी एकाच कवीचे दहा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा विक्रम करण्यात येणार आहे. यावेळी आठवे महाकाव्य संमेलन असल्यामुळे आठ पुस्तकांचे प्रकाशन, आठ काव्य मैफल आणि तीन परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या सहभागी होणार्या प्रत्येक कवीला सहभाग विनामूल्य व चहा, नाष्टा, निवास ,भोजन याची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कवीला सहभागाबद्दल आकर्षक सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.





