Pimpri : मावळातील दोन रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

तळेगाव दाभाडे : भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण नऊ स्थानकांचा समावेश आहे.
मावळ तालुक्यातील देहू रोड आणि तळेगाव स्टेशन या दोन स्थानकांचा योजनेत समावेश करण्यात आला असून यामुळे सदर रेल्वे स्थानकांत आधुनिकीकरणासह चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देहू रोड स्टेशन करिता ८.०५ कोटी आणि तळेगाव स्टेशन करिता ४०.३४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.





