Pimpri : तळवली दांडवाडी येथे आदिवासींची घरे कोसळली

खालापूर : तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागात नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असून वीट व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
चक्रीवादळासह झालेल्या पावसाने खालापूर तालुक्यातील तळवली दांडवाडी येथील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांनी तातडीने वाडीला भेट देऊन सर्व अधिकारी वर्गाला नुकसानीची माहिती दिली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, यावर्षी जसे अवकाळी पावसाने नागरिकांचे नुकसान झाले, तसाच प्रकार दोन वर्षापूर्वी म्हणजेच २०२३ मध्येही झाला होता. तेव्हाही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले होते, तेव्हा नुकसानीचे पंचनामेही झाले होते. परंतु संबंधित नागरिकांना अद्याप मदत मिळाली नसून पंचनामे कागदावरच आहेत. त्यामुळे यावेळी तरी मदत मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान
खालापूर तालुक्याला शुक्रवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या अवकाळीत तळवली दांडवाडी येथील हरिश्चंद्र वाघे, अनंत वाघे, रामदास पवार, बबन वाघे, मोहन हिलम, अनंता हिलम, दिलीप पवार, नकुल वाघे, सदा वाघे, विठोबा जाधव, प्रभाकर वाघे, भीमा वाघे, शिवाजी वाघे, परशुराम पवार, शंकर पवार, सुरेश जाधव, रघुनाथ जाधव, गणेश कातकरी यांच्या घरांचे थोड्या अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. या नागरिकांचे लक्ष आता सरकारच्या मदतीकडे आहे.
खालापूर तालुक्यात शुक्रवारी (दि.४) झालेल्या अवकाळी पावसामुळे व चक्री वादळामुळे काही गावांतील घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याबाबत तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.
– अभय चव्हाण, तहसीलदार, खालापूर
तळवली दांडवाडी येथील घरांचे नुकसान झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत वडगावच्या माध्यमातून जे दाखले हवे असतील ते आम्ही नुकसानग्रस्तांना देणार आहोत. यासह ग्रामपंचायतीकडून शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल.
– सुहास वारे, ग्रामविकास अधिकारी, वडगाव ग्रामपंचायत





