Pimpri : आरटीओत ऑनलाइन सुविधांचे तीनतेरा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ऑनलाइन सुविधांचा बोजवारा उडाला असून, यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन होणे, अर्ज न भरले जाणे, फोटो अपलोड न होणे यासारख्या तांत्रिक समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यावर कार्यालयाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑनलाइन सुविधांच्या या गोंधळामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
आरटीओने नागरिकांचा वेळ आणि त्रास वाचावा म्हणून वाहन नोंदणी, चालक परवाना अर्ज, परवाने नूतनीकरण, वाहन स्थानांतरण, योग्यता प्रमाणपत्र, कर संबंधित सेवा, चलन भरणा आणि तपासणी या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या सुविधांचा वापर करताना नागरिकांना सातत्याने तांत्रिक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही पुन्हा कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत. या समस्या कधी सुटणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांना येणाऱ्या प्रमुख अडचणींमध्ये संकेतस्थळाचा धीमा वेग किंवा डाऊन होणे, सर्व्हरमधील बिघाडामुळे अर्ज न भरले जाणे, अर्ज केवळ इंग्रजी भाषेत असल्याने येणारा त्रास आणि मोबाइलवर ओटीपी न मिळणे यांचा समावेश आहे. एका नागरिकाने सांगितले की, “मित्राच्या वाहन परवान्यासाठी आलो होतो. ओटीपी पाठवल्याचे सांगितले गेले, पण तो मोबाइलवर आलाच नाही. अधिकाऱ्यांनीही नीट माहिती दिली नाही.”
दरम्यान, नागरिकांचा ऑनलाइन सुविधांवरील विश्वास उडत असून, या समस्यांचे तातडीने निराकरण होणे गरजेचे आहे.
केंद्रीय स्तरावर नवीन सर्व्हर सुरू
यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण म्हणाले, “पीयुसीसाठी सर्व्हर डाऊनची समस्या होती, पण ती आता सुधारली आहे. केंद्रीय स्तरावर नवीन सर्व्हर सुरू झाल्याने कार्यालयीन कामकाजातील अडचणी कमी झाल्या आहेत. नागरिकांनी मोबाइल क्रमांक अपडेट केल्यास ओटीपी मिळेल. तसेच, अर्ज भरताना मराठी भाषेची लेबले असावीत, अशी मागणी वरिष्ठांकडे केली जाईल.”
यामुळे वाढतेय आरटीओ कार्यालय परिसरात गर्दी
पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयात दररोज सुमारे पाचशे ते सहाशे नागरिक विविध कामांसाठी येत असतात. आरटीओची बुहतांश सर्वच कामे ऑनलाइन जरी झाली असती, तरी ऑनलाइन भरलेले अर्ज देण्यात कार्यालयात यावे लागते. मात्र, आरटीओची ऑनलाइन सेवा बारगळली असल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. त्यात अधिकारीही व्यवस्थित सांगत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे एकाच कामासाठी नागरिकांना पुन्हा पुन्हा आरटीओ कार्यालयात यावे लागत असल्याने अनावश्यक गर्दी वाढत आहे.





