Pimpri : चोरट्यांची नजर आता शेतमालावर

देहूगाव : सध्या कांद्याला बाजार भाव मिळत नसला तरीही चोरट्यांनी शेतातील दहा ते अकरा गोण्या म्हणजे साडेपाच क्विंटल कांदे चोरून नेल्याची धक्कादायक घटना देहू येथे घडली आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी चिंतातूर असून आता चोरट्यांची नजर शेतमालावर असल्याचे दिसून येत आहे.
हवामान खात्याने राज्याच्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा व गारपिटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात काढणीस आलेल्या पिकाची काळजी घेत पीक तातडीने काढत आहे. देहू, विठ्ठलवाडी, बोडकेवाडी, काळोखे मळा, हगवणे मळा, येलवाडी, सांगुडी, कान्हेवाडी परिसरातील शेतकरी शेतातील गहू, बाजरी, ज्वारी, कांदे आदी पिकांची काळजी घेत काढणीस आलेले पिके तत्परतेने काढत आहे. परंतु शेतात काढलेले पीक लंपास करणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाल्याने शेतकरी हैराण आहे.
लाईट गेली आणि डाव साधला
देहू परिसरातील शेतकरी अंकुश दामोदर हगवणे यांनी शेतातील काढणीस आलेले कांदे काढून कांद्याची पोती भरून शेतात रास लावून ठेवली होती. दरम्यान सोमवारी (दि.३१) रात्री विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्याचवेळी परिसरात विज नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीचे साडेपाच क्विंटल कांदे चोरून नेले. असाच प्रकार हगवणे मळा इथेही होत होता, परंतु तेथील जागरूक तरुणांमुळे चोरट्यांनी पळ काढला.
दरम्यान रासायनिक खते, बी बियाणे यांचे वाढलेले दर, शेतातील कामांसाठी मजूर, शेतमालांना न मिळणारा बाजार भाव आदी बाबींनी शेतकरी पुरता हवालदिल झालेला असताना आता चोरट्यांची नजर शेतातील पिकांवर आली असल्याने शेतकऱ्यांना अस्मानी सोबत जमिनीवरील सुलतानांपासूनही पिकाचे रक्षण करण्याची वेळ आली आहे.





