Pimpri : गावरान आंब्याची चव आता केवळ आठवणीतच!

पिंपळे गुरव : उन्हाळा संपत आला तरी बाजारात गोरगरिबांच्या ताटात पारंपरिक गावरान आंब्याचा रस मात्र दिसेनासा झाला आहे. शहरी बाजारपेठेत महागड्या कलमी आंब्यांनी कब्जा केला असून गावरान आंबे केवळ आठवणींत उरले आहेत. दरम्यान, नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे गावरान आंब्याचे उत्पादन घटले असून या चविष्ट फळाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे.
पूर्वी उन्हाळ्यात गावरान आंब्यांचा सुगंध गल्लीगल्लीत दरवळायचा. शहरातील बाजारात भरपूर गावरान आंबे मिळायचे. मात्र आता हे चित्र पालटले आहे. बाजारात केशर, हापूस, तोतापुरी, नीलम यांसारख्या कलमी आणि महागड्या आंब्यांचा बोलबाला आहे. शेतकऱ्यांकडून गावरान आंब्याच्या झाडांची तोड आणि फळ देण्यासाठी लागणाऱ्या कालावधीमुळे त्यांनी कलमी झाडांकडे कल केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या मुख्य बाजारपेठेत कलमी आंब्याच्या दरात यंदा प्रतिकिलो १०० ते १८० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, दुर्मिळ गावरान आंबे मोजक्या प्रमाणात उपलब्ध असून त्यांचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. परिणामी, मध्यमवर्गीय आणि गरीब ग्राहकांना गावरान आंब्याची चव चाखणेही कठीण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत शेतकरी अधिक उत्पन्नासाठी गावरान आंब्याची झाडे तोडून त्याऐवजी कलमी आंब्याची झाडे लावत आहेत. यामुळे ‘गोटी’, ‘शेंद्री’, ‘साखऱ्या’, ‘भोपळी’, ‘खोबरी’ आदी पारंपरिक जाती नामशेष होत चालल्या आहेत. अनेकांच्या आठवणीतच या आंब्यांची चव राहिली आहे.
हवामानाचा दुष्परिणाम
मे महिन्याच्या सुरुवातीलाच पडलेल्या वाऱ्यासह पावसाने आंब्याची कैऱ्या झाडांवरून गळून पडल्या आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनात घट झाली आहे. उपलब्ध फळांवरही डाग व कीड येण्याचा धोका वाढला आहे, असे शेतकरी सांगत आहेत. पिंपरी चिंचवड सारख्या शहरात पारंपरिक गावरान आंब्याची चव आता दुर्मिळ होत चालली आहे. बदलते हवामान, शेतीतील बदलती प्रवृत्ती आणि बाजारातील कलमी आंब्यांची वाढती मक्तेदारी यामुळे शहरी ग्राहकांना अस्सल आंब्याचा गोडवा अनुभवण्याची संधी कमी होत चालली आहे.
गावरान आंब्याची खास चव आता कुठेच मिळत नाही. बाजारात जे मिळते ते रासायनिक प्रक्रिया केलेले महागडे आंबेच असतात. आधी एखादा गोटा आंबा घेऊन रस बनवला की संपूर्ण घराचा दरवळ वेगळा असायचा. आता ती मजा उरलेली नाही.
– सोनाली कांबळे, गृहिणीगावरान आंब्यांची आवक फारच कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना कलमी आंब्यांवर समाधान मानावे लागते. शेतकरी आता कलमी झाडेच लावतात. परिणामी गावरान आंब्याची चव बाजारातून हद्दपार झाली आहे.
– सत्यवान बागुल, व्यापारी





