Pimpri : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्तान

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३४० वा पालखी सोहळा १८ जुन रोजी श्री श्रेत्र देहूगाव येथून दुपारी प्रस्तान ठेवणार आहे. त्या अनुषंगाने संपुर्ण पालखी सोहळ्याचा कार्यक्रम संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी मंगळवारी (दि. २९ ) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे आदी उपस्थित होते.
श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १८ जुन २०२५ रोजी सुरू होणार असून हा सोहळा ६ जुलैला पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे. येथे पालखी पंढरपूर येथील नवीन श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मंदिरात विसावणार आहे. येथे पालखी सोहळा ६ जुलै ते ते १० जुलै २०२५ अखेर मुक्कामी असणार आहे.
हा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने अंथुर्णे येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे यंदा पालखी लोणी काळभोर पासुन पुढे गेल्यानंतर दुपारच्या १ तासाच्या विश्रांतीसाठी शिंदवणे चौक पी.डी.सी.सी. बॅंकेसमोर थांबणार आहे. हा पालखी सोहळा ३४ दिवसांचा प्रवास करणार असून ३५ व्या दिवशी २१ जुलैला २०२५ रोजी देहूत दाखल होणार आहे.
पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात, दि. १९ जुन रोजी इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गाजवळ पालखी थांबेल तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल आणि संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामासाठी थांबेल.
२० व २१ जुनला पुण्यात नानपेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी, २२ जुनला पुण्यातून लोणी काळभोर कदम वाकवस्ती पालखीतळाकडे रवाना होईल व येथेच मुक्कामी राहिली. २३ जुनला यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी, २४ जुनला वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी, २५ जुनला पालखी उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामी.
२६ जुनला बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगमात मुक्कामी, २७ जुनला सणसर येथे मुक्कामी, २८ जुनला पालखी सणसर मधुल पहाटे निघेल व वाटेत बेलवडी येथे पहिले (गोल रिंगण) करेल. रात्री निमगाव केतकी येथे मुक्काम, २९ जुनला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण, रात्री मुक्कामी, ३० जुनला सराटी मुक्कामी, १ जुलैला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान घालुन पालखी अकलुजकडे मार्गस्थ होत तिसरे गोल रिंगण पुर्ण करेल.
अकलुजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुक्काम, २ जुलैला अकलुजवरून माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल. रात्री बोरगाव येथे मुक्कामी, ३ जुलैला तोंडले बोंडले येथे धावा करून पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी, ४ जुलैला सायंकाळी बाजीराव विहिर येथे दुसरे उभे रिंगण पार झाल्यानंतर वाखरी येथे मुक्काम, ५ जुलैला वाखरी येथून पादुका आरतीस्थळी शेवटचे व तिसरे उभे रिंगण, सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल, श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावेल. येथे पालखी १६ ते १० जुलै अखेर मुक्कामी असेल. १० जुलैला पालखी सोहळ्यानंतर १२ दिवसांचा परतीच्या प्रवासानंतर श्री क्षेत्र देहूगाव येथे २१ जुलैला पोहचेल.
लोणी काळभोर वरून पालखी सोहळा निघाल्यानंतर उरुळी कांचन मार्गे पुढे जात असतो. हा पालखी सोहळा पुर्वीपासुन गावातून जात असे. सध्या पालखी सोहळा गावातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागतात. याचा विचार करून व गत वर्षी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार यंदा येथील ग्रामस्थांशी चर्चा करून व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या विनंती अर्जानुसार पालखी सोहळा दुपारच्या एक तासाच्या विसाव्यासाठी शिंदवणे येथील पीडीसीसी बॅकेसमोर थांबणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी सांगितले.





