Pimpri : मावळमधील बेघरांना मिळाले हक्काचे घर !

मावळ : श्री छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री ग्रामीण व कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला मावळ तालुक्यातील घरकुलांचे लाभार्थीही उपस्थित होते.
दरम्यान, पंचायत समिती मावळ येथे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ठ घरकुल बांधकाम करण्याऱ्या लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, नेमप्लेट, चावी वाटप प्रदान करण्यात आली. तसेच सर्वाधिक घरकुल बांधकाम करणाऱ्या ग्रामपंचायतीस उत्कृष्ठ ग्रामपंचायत म्हणून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि सदस्यांना प्रमाणपत्र, झाडे रोपटे देऊन गौरविण्यात आले.
घरकुलांचे ऑनलाइन भूमिपूजन
ग्रामपंचायत टाकवे खुर्द येथील पीएम जनमन योजनेअंतर्गत मंजूर गायरान जागेचे भूमिहीन लाभार्थ्यांच्या घरांचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत धामणे, ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक येथील घरकुल लाभार्थ्यांचे ऑनलाइन गृहप्रवेशही या प्रसंगी करण्यात आला. ग्रामपंचायत सुदुंबरे, सुदवडी आणि मुंढावरे येथील भूमिहीन लाभार्थ्यांना पीएमएवाय / पीएम जनमन अंतर्गत गायरान जागा मंजुरीचे सातबारे वाटप करण्यात आले.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या समुहांच्या अध्यक्षा, सचिव यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता प्रथम, राधा महिला समूह वाकसाई द्वितीय, शिवकन्या महिला समूह ओझर्डे तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी, केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गरिबातील गरीब कातकरी, आदिवासी गरजू लाभार्थी यांचे घराचे स्वप्न शासनाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसते, ही आनंदाची बातमी असल्याचे मत व्यक्त केले.
मावळ तालुक्यात १६३३ घरकुलांना मंजुरी
गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनमध्ये १६३३ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन सन २०२५-२६ मध्ये १२४७ एवढे सर्वेक्षण पूर्ण झाले असून पुढील टप्प्यामध्ये पात्र लाभार्थ्यांनाही घरकुल देण्यात येईल, असे सांगितले. तसेच, पीएमएवाय / पीएम जनमनमध्ये ३१ ग्रामपंचायतीअंतर्गत भूमिहीन लाभार्थींना घरे मंजूर झाली असून ही घरे उत्तम मॉडेल आणि सीएसआरची जोड देऊन करण्यात येतील, असेही सांगितले.





