Pimpri : माथेरानचे भवितव्य : राजकारण, नियम आणि पर्यटन विकास

माथेरान : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथेरान हे निसर्गसंपन्न पर्यटन स्थळ अनेक दशकांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरत आले आहे. इथल्या धुक्यात हरविलेले डोंगर, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, घनदाट जंगल, ट्रॉय ट्रेन, घोडेस्वारी आदी गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक वर्षभर माथेरानला भेट देतात. मात्र, या रम्य निसर्ग सौंदर्याच्या पाठीमागे एक कटू वास्तवही आहे. ते म्हणजे राजकीय उदासीनता, नियोजनाचा अभाव आणि स्थानिक नागरिकांची उपेक्षा.
निवडणूक जवळ आली की माथेरानच्या दिशेने राजकीय वाऱ्यांची गती वाढते. आश्वासनांचा धबधबा, नव्या योजनेची घोषणाबाजी आणि प्रचाराच्या मोठमोठ्या पोस्टर्सनी माथेरान झाकलं जातं. गेल्या कित्येक निवडणुकांत जवळपास प्रत्येक पक्षाने माथेरानच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखविले, परंतु निवडणूक संपली की हे स्वप्न पुन्हा धुक्यात हरवते.
स्थानिकांवर ‘अनधिकृत’चा शिक्का
माथेरानमध्ये राहणाऱ्या अनेक स्थानिक नागरिकांची स्थिती अतिशय विचित्र आहे. स्वतःच्या जमिनीवर घर बांधून राहत असतानाही ‘अनधिकृत’ ठरवले जाते. या टॅगमुळे त्यांना कोणतीही सुविधा पाणी, वीज, शौचालय, आरोग्यसेवा मिळविताना हजार अडथळे पार करावे लागतात.
पर्यटनात वाढ, पण नियोजन नाही
दरवर्षी हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळते. परंतु याला पूरक असा ठोस पर्यटन विकासाचा आराखडा अद्याप अस्तित्वात नाही. पायवाटांचे डबके, अपूर्ण कचरा व्यवस्थापन, टुरिस्ट पॉइंट्सची दुर्दशा, टॉय ट्रेनची अस्थिर सेवा ही सर्व चिन्हं एकच सांगतात, माथेरान पर्यटनदृष्ट्या टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न झालेला नाही.
विकासाला नियम, कायद्यांचा विळखा
माथेरान हा ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ असल्याने इथे अनेक नियम-कायदे लागू आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही निश्चित प्राथमिकता आहे, पण या नियमांचा अतिरेक आणि स्थानिकांच्या हितविरोधी अंमलबजावणी यामुळे येथील विकास थांबलेला आहे.
विकास आणि पर्यावरणाच्या संतुलनाची गरज
माथेरानच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता नव्या दिशेने वाटचाल आवश्यक आहे. स्थानिकांना त्यांच्या जमिनीवर हक्काने राहता येईल, अशा ठोस धोरणांची गरज आहे. पर्यटन शाश्वत, नियोजित आणि पर्यावरणपूरक असायला हवे. सरकार, स्थानिक संस्था आणि पर्यावरणतज्ज्ञ यांनी मिळून एक समन्वित विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. घोषणांपेक्षा कृतीला प्राधान्य देत, स्थानिकांचा सहभाग आणि पर्यावरण संवर्धन या दोन गोष्टी एकत्र साध्य करताच माथेरान खऱ्या अर्थाने विकसित होईल.





