Pimpri : मेट्रो पिलरच्या सळईचा सांगाडा अचानक कोसळला

पिंपरी : चिंचवड स्टेशन परिसरात सुरु असलेल्या मेट्रो पिलरच्या कामावेळी एक मोठा अपघात टळल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मेट्रोच्या पिलरसाठी उभारण्यात आलेला लोखंडी सळईचा सांगाडा रात्री अकरा वाजताच्या सुमारास अचानक कोसळला.
हा सांगाडा थेट ग्रेडसेपरेटरवर कोसळल्याने जोरदार आवाज झाला. यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, कोसळलेल्या सळईचा काही भाग ग्रेडसेपरेटरवरून जात असलेल्या वाहनावर पडल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
दरम्यान, रात्रीच्या वेळेस रहदारी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर काही वेळातच संबंधित ठेकेदार व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून सांगाडा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. मेट्रो प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरु असून, सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.





