पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरातील सहा लाख घरांमध्ये संविधान उद्देशिकाचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्राबाई फुले स्मारक येथे शनिवारी (दि. ७) प्रारंभ करण्यात आला. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय संविधानाचा गौरव’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समाज विकास विभागाच्या संतोषी चोरगे, माजी शहर अभियंता महावीर कांबळे, माजी कार्यकारी अभियंता वसंत साळवी, महापालिकेचे निवृत्त अधिकारी अनिल सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रोकडे, धुराजी शिंदे, राजेंद्र साळवे, संतोष जोगदंड, मनोज गजभार, तुकाराम गायकवाड, दीपक म्हस्के, सुरेश रोकडे, नरेंद्र बनसोडे, कविता म्हस्के, प्रमिला ठोंबरे, मंजू जैस्वाल आदी उपस्थित होते. प्रा.डॉ. पवार म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानातील प्रत्येक कलम हे मानवी मूल्यांचे रक्षण करणारे आहे, आम्ही भारताचे लोक या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शब्दातच देशाला एकता, अखंडता व समानतेत गुंफले आहे. प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे. याशिवाय आपले मत व्यक्त करण्याचा, आपल्या मनाप्रमाणे नोकरी, उद्योग, व्यवसाय करण्याचाही अधिकार दिलेला आहे. आपल्या संविधानामुळे देशात प्रत्येक जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. याच एकतेच्या जोरावर भारताने विविध क्षेत्रात प्रगती करत जागतिक स्तरावर आपल्या देशाचे स्थान उंचावले आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन उद्देशिका वितरणाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.