Pimpri : अवकाळीमुळे शहराच्या तापमानात घट

पिंपरी : सलग दोन दिवस अवकाळीने शहराच्या विविध भागांत अवकाळीने लावलेल्या हजेरीने कमाल तापमानात सुमारे 4 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. तर सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण असून, दुपारी उशिराने सुर्यदर्शन झाले. परिणामी शहरात उकाडा जाणवत होता.
वातावरणातील बदलामुळे बुधवारपासून शहराच्या कमाल तापमानात मोठी घट दिसून आली. मंगळवारी (दि.6) चिंचवडमध्ये कमाल 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर बुधवारी(दि.7) 32.6 अंश सेल्सिअस तर गुरुवारी (दि.8) कमाल तापमानात काहीशी घट होऊन ते 32.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.
याशिवाय आज दिवसभरात डुडुळगावमध्ये 31.5 अंश सेल्सिअस तर दापोडीत 31.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील 5 दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.





